Video: हनुमा विहारी केला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांच्याबरोबर असलेल्या खास नात्याचा खुलासा

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

त्याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करताना कठिण परिस्थितीतून भारतीय संघाला बाहेर काढण्यात महत्तावाचा वाटाही उचलला.

त्याने या सामन्यात पहिल्या डावात 124 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 56 धावा केल्या आहेत. तसेच त्याने अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा बरोबर सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली.

विहारी हा भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 292 वा खेळाडू ठरला आहे. आंध्रप्रदेशमधून आलेल्या या खेळाडूने भारतीय संघाचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्याबरोबर असलेल्या खास नात्याचा खुलासा केला आहे.

याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यात श्रीधर हे विहारीची मुलाखात घेत आहेत. यात विहारीने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

श्रीधर हे विहारीचे लहानपणीचे प्रशिक्षक असुन ते आता भारतीय संघातही त्याला प्रशिक्षण देत आहेत.

याबद्दल बोलताना विहारी म्हणाला, ‘मी मोठा होत असताना श्रीधर यांनी मला प्रशिक्षण दिले आहे. तसेच पदार्पणाच्या महत्त्वाच्या वेळी आम्ही एकत्र असल्याचा मला आनंद आहे. माझ्या या खास क्षणी ते माझ्या बरोबर असल्याने आनंद होत आहे.’

याबरोबरच विहारीने श्रीधर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, ‘सुरुवातीला जशी परिस्थिती होती त्यामुळे दबाव होता. पण नंतर मी कोण गोलंदाजी करत आहे याचा विचार न करता फलंदाजी केली. तसेच सुरुवातीला विराट कोहली दुसऱ्या बाजूने खेळत असल्याने मला आत्मविश्वास मिळाला.’

तसेच विहारीने त्याच्या या प्रवासाबद्दल सांगितले की हे सर्व कठिण होते, कारण प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत इथपर्यंत येणे सोपे नव्हते. सध्या आयपीएल सारख्या स्पर्धा असताना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येणे हा कठिण मार्ग आहे.

श्रीधर यांनीही सोशल मिडीयावर विहारीच्या पदार्पणानंतर त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

विहारीने 63 प्रथम श्रेणी सामन्यात 15 शतके आणि 24 अर्धशतकांसह 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत.

तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 56 सामन्यात 47.25 च्या सरासरीने 4 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2268 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर तो यावर्षी जून जुलैमध्ये भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. विहारीने या दौऱ्यात 8 सामन्यात 410 धावा करताना 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.

तसेच आॅगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन चार दिवसीय कसोटी सामन्यात त्याने भारत अ संघाकडून एक शतक आणि एक अर्धशतकासह तीन डावात 202 धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम

युएस ओपन २०१८: उपविजेत्या सेरेना विल्यम्सला झाला १२ लाखांचा दंड!

Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत