आंतर क्लब टेनिस स्पर्धेत सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात सोलारिस आरपीटीए व डेक्कन अ या संघांनी  ओडीएमटी अ व एफसी अ संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन अ संघाने एफसी अ संघाचा 24-13असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

सामन्यात 100अधिक गटात डेक्कनच्या नंदन बाळ व अमित पाटणकर यांनी एफसीच्या पुष्कर पेशवा व राजेश जोशी  6-4 असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या संग्राम चाफेकरने ऋषिकेश पाटसकरच्या साथीत एफसीच्या सुमित सातोस्कर व धनंजय कवडे या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला आघाडी मिवळून दिली.

90अधिक गटात डेक्कनच्या अजय कामत व मुकुंद जोशी या जोडीने एफसीच्या संजय रासकर व पंकज यादव यांचा 6-3 असा तर, खुल्या गटात डेक्कनच्या विक्रांत साने व मंदार वाकणकर यांनी गणेश देवखिळे व पुष्कर पेशवा यांचा 6-3असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलारिस आरपीटीए संघाने ओडीएमटी अ  संघाचा 20-16 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून संजीव घोलप, कैफी अफजल, रवींद्र पांडे, जयंत पवार यांनी अफलातून कामगिरी केली. डेक्कन अ, फर्ग्युसन कॉलेज अ, सोलारिस आरपीटीए आणि ओडीएमटी अ या संघांचा पुढील वर्षीच्या इलाईट डिव्हिजन गटात समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: प्लेट डिव्हिजन गट:

डेक्कन अ वि.वि.एफसी अ 24-13(100अधिक गट: नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.पुष्कर पेशवा/राजेश जोशी  6-4; खुला गट: संग्राम चाफेकर/ऋषिकेश पाटसकर वि.वि.सुमित सातोस्कर/धनंजय कवडे  6-3; 90अधिक गट: अजय कामत/मुकुंद जोशी वि.वि.संजय रासकर/पंकज यादव 6-3; खुला गट: विक्रांत साने/मंदार वाकणकर वि.वि.गणेश देवखिळे/पुष्कर पेशवा 6-3);

सोलारिस आरपीटीए वि.वि.ओडीएमटी अ  20-16(100अधिक गट: नाम जोशी/रवींद्र पांडे पराभूत वि.संतोष कुराडे/उदय गुप्ते 5-6(4-7);खुला गट: संजीव घोलप/कैफी अफजल वि.वि.चंदन नागडकर/बिनेश राजन  6-2; 90अधिक गट: रवींद्र कात्रे/हेमंत भोसले पराभूत वि.अतुल मांडवकर/नितीन सिंघवी 3-6; खुला गट: रवींद्र पांडे/जयंत पवार वि.वि.संतोष कुराडे/कोनार कुमार 6-2).