कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्या कर्णधाराने केला डाव घोषित

पोर्ट एलिझाबेथ । दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या आणि एकमेव कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने कसोटीच्या पहिल्याच दिवशी डाव घोषित केला.

७८.३ षटकांत ९ बाद ३०९ अशी अवस्था असताना एबी डिव्हिलिअर्सने आफ्रिकेचा डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेने १६ षटकांत ४ बाद ३० धावा केल्या.

या डाव घोषित करण्यामुळे मात्र डिव्हिलिअर्सचे नाव इतिहासात लिहिले गेले. असा कारनामा करणारा तो जगातील केवळ ५वा आणि आफ्रिकेचा दुसरा कर्णधार आहे.

यापूर्वी फाफ डुप्लेसीने २०१६मध्ये दिवस रात्र कसोटी सामन्यात ॲडलेडला डाव पहिल्याच दिवशी घोषित केला होता तर २०१३मध्ये हैद्राबाद कसोटीत मायकेल क्लार्कने भारताविरुद्ध पहिल्याच दिवशी डाव घोषित केला होता.

हा सामना ४ दिवसीय असून यात प्रत्येक दिवशी कमीतकमी ९८ षटके गोलंदाजी केली जाणार आहे. त्यामुळे ७९व्या षटकात डाव घोषित करून लगेच डिव्हिलिअर्सने झिम्बाब्वेला फलंदाजीला पाचारण केले. विशेष म्हणजे पुढच्या १६ षटकांत ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या ४दिवसीय सामन्यात १५० धावांचा फरक राहिला तर फॉललो-ऑन देता येणार आहे. त्यामुळे आफ्रिकेकडे उद्या मोठी संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्सचा हा पुनरागमनाचा सामना असून जानेवारी २०१६ नंतर प्रथमच कसोटी सामना खेळत आहे.