युवराज सिंगच्या खराब कामगिरीचा पंजाब संघाला फटका, टी२० स्पर्धेतून बाहेर

कोलकाता । सईद मुश्ताक अली स्पर्धेतून आज पंजाबचा संघ बाहेर पडला. कर्णधार युवराज सिंगच्या खराब कामगिरीबरोबरच अन्य फलंदाजांनाही साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे राजस्थान विरुद्ध विजय मिळवूनही पंजाब संघाला अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही.

राजस्थानचा कर्णधार अनिकेत चौधरीने आज नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. पंजाब संघातील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे संघाने २० षटकांत ८ बाद १२९धावा केल्या.

त्यात पंजाब संघाचा माजी कर्णधार आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या हरभजन सिंगने सर्वोच्च धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३२ धावा केल्या. याच पंजाबकडून सर्वोच्च धावा ठरल्या.

कर्णधार युवराज सिंगला मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही. तो ४ धावांवर असताना यष्टिचित झाला.

एवढ्या कमी धावा होऊनही पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत राजस्थानला २० षटकांत ८ बाद १२४ धावांत रोखले.

त्यामुळे पंजाब संघाला ५ धावांनी विजय मिळवता आला. परंतु बाद फेरीत नेट रनरेट योग्य न राखल्यामुळे राजस्थान संघ पंजाब एवढेच सामने जिंकूनही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

युवराज सिंगने या संपूर्ण स्पर्धेत अतिशय धीम्या गतीने धावा जमवल्या. बाद फेरीत युवराजने ४, १७, ४० आणि २९ धावा केल्या. ह्या करताना युवराजचा स्ट्राइक रेट अतिशय खराब राहिला.

राजस्थान संघ उद्या अर्थात २६ जानेवारी रोजी दिल्ली संघाविरुद्ध विजेतेपदासाठी उद्या संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी दोन हात करणार आहे.