ISL 2018: दिल्लीसाठी अस्तित्व तर चेन्नईसाठी आव्हान पणास

दिल्ली: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी तळातील दिल्ली डायनॅमोज एफसी आणि प्रमुख संघांमधील चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होत आहे.

दिल्लीचे आव्हान संपले असले तरी व्यावसायिक प्रतिष्ठा पणास लागलेली असेल, तर चेन्नईला बाद फेरीचे आव्हान भक्कम करणे आवश्यक असेल.

या लढतीच्या निकालाने दिल्लीचे नशीब बदलणार नाही, पण चेन्नईसाठी नक्कीच फरक पडू शकतो. चेन्नई 13 सामन्यांतून 23 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इतर प्रमुख संघांच्या तुलनेत त्यांचा किमान एक सामना कमी आहे. जिंकल्यास त्यांना दुसरा क्रमांक गाठता येईल, पण हरल्यास त्यांचे स्थान बदलणार नाही.

चेन्नईने गेल्या दहा सामन्यांत विलक्षण योगायोग साधला आहे. दोन सामन्यांत एक विजय मिळविण्यात त्यांना यश आले आहे. मागील सामन्यात त्यांचा बेंगळुरू एफसीकडून पराभव झाला आहे. त्यामुळे आता हाच क्रम कायम राहिल्यास मोसमात केवळ दोन विजय मिळवू शकलेल्या दिल्लीला ते हरवतील.

दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनी संघाच्या स्थितीबद्दल सांगितले की, कारण सोपे आहे. चेंडू मैदानावर असेल तर आम्ही चांगला खेळ करतो. आम्ही वेगाने नियंत्रीत खेळ करतो आणि चांगले स्वरुप साधतो, पण आक्रमण होते आणि चेंडू हवेत जातो तेव्हा समस्या निर्माण होतात.

हवेतून चेंडू येऊन आक्रमण होताच दडपणाखाली दिल्ली संघाला सामना करता येत नाही. त्यांच्या या कमकुवत बाजूचा फायदा उठविण्याचा चेन्नईचा प्रयत्न राहील.

चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांच्यासाठी एक सामना हातात असणे जमेची बाजू आहे. त्यामुळे ते काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन इतरांना आळीपाळीने खेळवू शकतात.

ते म्हणाले की, सर्वोत्तम संघ खेळविण्यास माझे नेहमीच प्राधान्य असते. त्यामुळे रविवारच्या सामन्यात फरक पडणार नाही. प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त आणि सज्ज आहे, केवळ कर्णधार उपलब्ध नाही.

आम्हाला मागील सामन्यात दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. सर्व दहा जण सर्वस्व पणास लावून खेळले. आता हे खेळाडू पराभवातून सावरून या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

ग्रेगरी यांनी हे आत्मविश्वासाने सांगताना बाद फेरीपासून संघ फार दूर नसल्याचे नमूद केले, पण संघ गाफील राहण्याची चूक करणार नाही आणि प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणार नाही असे ते आवर्जून म्हणाले.

त्यांनी सांगितले की, दिल्ली केवळ प्रतिष्ठा आणि व्यावसायिकतेसाठी खेळेल असे तुम्ही म्हणाल, पण चेन्नईत ते चांगले खेळले. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, पण दुर्दैवाने निकाल त्यांच्या बाजूने लागले नाहीत.

त्यांचे खेळाडू प्रतिभासंपन्न असल्यामुळे ते जिंकण्यासाठी प्रयत्न करतील अशी आमची अपेक्षा आहे.

चेन्नईला घरच्या मैदानावर दिल्लीने 2-2 असे बरोबरीत रोखले. घरच्या मैदानावर दिल्लीला गुण दिलेल्या फार थोड्या संघांमध्ये चेन्नईचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी भरपाई करण्याचा चेन्नईचा प्रयत्न राहील.