कालपेक्षा आज प्रदूषण जास्त, कसा दिवस काढला आम्हालाच माहित: अँजेलो मॅथ्यूज

दिल्ली । श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज शतकी खेळी केली. परंतु सामन्यानंतर भाष्य करताना त्याने दिल्लीतील प्रदूषणावर चांगलीच टीका केली.

रविवारी दोन वेळा प्रदूषणामुळे खेळाडूंना जो त्रास झाला त्यामुळे खेळ दोन वेळा थांबवण्यात आला होता. परंतु आज तशी कोणतीही परिस्थिती उद्भवली नाही तरीही या माजी कर्णधाराने आज प्रदूषणाची पातळी जास्त असल्याचे म्हटले आहे.

“हा कालच्या सारखाच दिवस होता. माझ्या मते तर कालपेक्षाही खराब दिवस असेल परंतु मी खात्रीशीर सांगू शकत नाही. “

“परंतु पुढच्या दोन दिवस आम्हाला याचा सामना करायचा आहे. त्यामुळे आम्ही याला तयार आहोत. “

आयसीसीने यावर काय निर्णय घ्यावा याबद्दल बोलताना तो म्हणाला, ” हे सर्व सामनाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांनी याबद्दल आयसीसीशी बोलायला हवं. ही एक वेगळीच समस्या असून आम्ही अशा समस्येला कधीही सामोरे गेलो नव्हतो. “

“मला खात्री आहे की सामनाधिकारी आणि दोन पंच बसून यावर चर्चा करतील आणि आयसीसीला कळवतील. ” असेही तो पुढे म्हणाला.