हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश

2019 विश्वचषकासाठी 15 एप्रिलला 15 जणांचा भारतीय संघ निवडण्यात आला. या संघात 12 ते 13 खेळाडूंची जागा जवळजवळ निश्चित होती. मात्र दोन ते तीन जागांसाठी स्पर्धा होती. त्यामुळे संघनिवड झाल्यानंतर काही आश्चर्यकारक निर्णय पहायला मिळाले.

यामध्ये मधल्या फळीत फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

पण काही महिन्यांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रायडूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठिंबा दिला होता. मात्र त्यांनंतरही त्याला वगळून शंकरचा संघात समावेश केल्याने अनेकांनी या निर्णयावर टीका केली.

मात्र कोहलीने शंकरला पाठिंबा दिला आहे. त्याने इंडिया टूडेला मुलाखत देताना म्हटले आहे की ‘विजय शंकर संघासाठी खूप काही घेऊन येतो. त्यामुळेच तो संघात असल्याने मी आनंदी आहे.’

शंकरने मागील काही सामन्यांमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने भारताकडून 9 वनडे सामने खेळले असून यात त्याने 33 च्या सरासरीने 165 धावा केल्या आहेत. तसेच 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 टी20 सामने खेळताना 25.25 च्या सरासरीने 101 धावा केल्या आहेत आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच त्याचे संघातील स्थान पक्के झाले असल्याचे याआधीच भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे. ते म्हणाले ‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीतील अनेक फलंदाजांना संधी दिली. यात कार्तिक, श्रेयस अय्यर, मनिष पांडे यांचा समावेश होता.’

‘आम्ही रायडूलाही काही अधिक संधी दिल्या, पण विजय शंकर हा त्रिआयामी खेळाडू आहे. तो फलंदाजी करु शकतो, जर गरज लागली तर गोलंदाजी करु शकतो. तसेच तो क्षेत्ररक्षक आहे. आम्ही त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहत आहोत. आता आमच्याकडे त्या जागेसाठी बरेचसे पर्याय आहेत.’

त्याचबरोबर विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘आम्ही निवडलेल्या 15 खेळाडूंबद्दल आम्ही खूश आहेत. हा समतोल असलेला संघ आहे. कारण सध्या सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या –

रैना, कोहलीनंतर हिटमॅन रोहित शर्मानेही केला तो खास विक्रम

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय

धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली