डिव्हिलियर्सने झळकावले अर्धशतक, पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिका ३ बाद १०७ धावा

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने नाबाद अर्धशतक केले आहे. हे त्याचे कसोटीतील ४१ वे अर्धशतक आहे.

दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या पहिल्या सत्रात ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्स ५९ धावांवर आणि डुप्लेसिस ३७ धावांवर नाबाद खेळत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीनही फलंदाजांना भुवनेश्वर कुमारने लवकर बाद करून भारताला चांगली सुरुवात दिली होती. भुवनेश्वरने डीन एल्गारला शून्यावरच बाद केले होते. त्यानंतर त्याने एडन मारक्रम(५) आणि हाशिम अमलाला(३) बाद करून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ धावा अशी केली होती. परंतु त्यानंतर डिव्हिलियर्स आणि फाफ डुप्लेसिस यांनी संघाचा डाव सावरला.

अर्धशतक करताना डिव्हिलियर्सने आक्रमक खेळ केला आहे , तर डुप्लेसिसने संयमी फलंदाजी करून डिव्हिलियर्सला चांगली साथ दिली आहे. या दोघांनी मिळून ९५ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.