तिसरी कसोटी: शिखर धवनचे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या सलामीवीर शिखर धवनने शतक लगावले आहे. शिखरच्या कसोटी कारकिर्दीतील हे ६ शतक आहे. भारताच्या संघाला के एल राहुल आणि शिखर धवन या दोन सलामीवीरांनी चांगली सुरुवात मिळवून दिली आहे.

भारताने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य आहे हे आज भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल यांनी दाखवून दिले.

शिखर धवनने आजपर्यंत ज्या ६ शतकी खेळी केल्या आहेत त्यातील ५ या भारताबाहेर केल्या आहेत. या शतकाबरोबर या कसोटीमालिकेत भारताकडून ६वी शतकी खेळी झाली.

२०११ नंतर परदेशी भूमीवर भारतीय सलामीवीराने कसोटी मालिकेत दोन शतकी खेळी करण्याची ही पहिली वेळ आहे. २०११ला इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडने सलामीवीराच्या जागी येऊन २ शतकी खेळी केल्या होत्या.

श्रीलंकेत ३ शतके करण्यासाठी धवनने केवळ ६डाव घेतले आहेत. हा भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे. सचिन आणि चेतेश्वर पुजारा यांनी अशी कामगिरी ५ डावात केली आहे.