धोनी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सक्षम : स्टिव्ह स्मिथ

एका आठवड्यच्या विश्रांती नंतर पुण्यात परतलेला रायझिंग पुणे सुपर जायन्ट संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे संघातील महत्व अधोरेखित करताना धोनी हा असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्रमांकावर खेळला तरी तो उत्तम खेळ करत एकहाती सामने फिरवू शकतो असे म्हटले. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघ बांधणी आणि इतर विषयांना स्मिथने दिलखुलास उत्तरे दिली.

धोनीबद्दल बोलताना स्मिथ पुढे म्हणाला की, “मागील सामन्यात त्याने आपल्या लयमध्ये परत येण्याचे संकेत दिले आहे, त्याचा बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात मारलेला षटकार हे दाखवून देतो”

पुणे संघाच्या कर्णधारपदाच्या दबावा विषयी विचारल्यास स्मिथ म्हणाला,” संघाचे नेतृत्व करणे हे माझ्यासाठी नवीन नाही , मी संघातील सर्व खेळाडू पूर्णपणे ओळखत नसलो तरीही माझा बाकी भारतीय खेळाडूंशी चांगला समन्वय आहे. मागील सामन्यात मिळालेला विजयाचे श्रेय हे सर्व संघाला जाते.”

संघातील भारतीय खेळाडूंपैकी कोणत्या खेळाडूने तुला सर्वाधिक प्रभावित केले असे विचारल्या नंतर तो म्हणाला ” गोलंदाजीमध्ये जयदेव उनाडकत आणि फलंदाजीमध्ये राहुल त्रिपाठी यांनी मला चांगलेच प्रभावित केले आहे .”
“फॅफ डुप्लेसी सारख्या मोठ्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणे हे मोठे अवघड काम आहे. परंतु अंतिम संघ निवडताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.”

” पुढील आठवड्यात आमच्या संघाचे पुण्यात चार सामने आहेत आणि मागील सामन्यात मिळालेले यश आम्ही पुढे नेऊ इच्छितो. आयपील आता निम्म्यावर आलेली असताना आमच्या संघाकडे ५ सामन्यात २ विजय आहेत आणि आता पुढील ४ घरच्या मैदानावरील लढतीमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू ” असेही स्मिथ पुढे म्हणाला.