धोनीवर २-३ सामन्यांची बंदी हवी होती, भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूचे परखड मत…

गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात नेहमी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या षटकात मैदानावर चिडून येत पंचाबरोबर नो बॉल प्रकरणी चर्चा केली.

त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याला या प्रकरणी 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.

तसेच अनेकांनी धोनीवर टीका केली आहे. यात भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागचाही समावेश झाला आहे. त्याने म्हटले आहे की धोनीवर दोन-तीन सामन्यांची बंदी घालायला हवी होती.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सेहवाग म्हणाला, ‘मला वाटते धोनीला खूप सोपी शिक्षा झाली आहे. त्याला 2-3 सामन्यांची बंदी घालायला हवी होती. कारण जर त्याने आज हे केले आहे तर उद्या दुसरा कर्णधार असेच करेल. मग पंचाची गरज काय?’

‘मला वाटते की त्याला काही सामन्यांची बंदी घातली असती तर उदाहरण ठेवता आले असते. त्याने त्यावेळी बाहेरच थांबायला हवे होते आणि वॉकी टॉकीवरुन फोर्थ अंपायरशी बोलायला हवे होते.’

‘मला वाटले त्याने मैदानावर यायला नको होते. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सचे दोन खेळाडू आधीच तिथे होते आणि ते नो बॉलबद्दल त्याच्याप्रमाणेच पंचाकडे विचारपूस करत होते.’

याबरोबर सेहवागने मजेशीरपणे असेही म्हटले की भारतीय संघाचे नेतृत्व करताना धोनीला असे करताना पाहिले नाही. सेहवाग म्हणाला, ‘त्याने जर भारतीय संघासाठी असे केले असते तर मी आनंदी झालो असतो. मी त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करताना असे चिडलेले पाहिले नाही. त्यामुळे मला वाटते तो चेन्नई संघाबद्दल थोडा जास्त भावनिक आहे.’

धोनी आणि पंचांमधील वाद – नक्की झाले काय?

गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 58 धावांवर असताना बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले.

यावेळी धोनी बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे यांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळात धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.

मात्र पंचांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे चेन्नईला नो बॉल मिळाला नाही. अखेर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मिशेल सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

या खास व्यक्तीमुळे बदलले विराट कोहलीचे आयुष्य…

कोहलीने रैनाला टाकले मागे, डिविलियर्सच्या साथीनेही केला खास विक्रम

पहिल्या विजयानंतरही कर्णधार कोहलीला झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण