म्हणून एमएस धोनीचे मानधन होणार कमी !

0 207

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला बीसीसीआय सर्वोच्च मानधन श्रेणीतून वगळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटुंची बीसीसीआय बरोबर असलेली केंद्रीय मानधन कराराची नवीन रचना तयार केली आहे.

या नवीन रचनेनुसार मानधनाच्या ४ श्रेणी असतील. यात अ+, अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील. पूर्वी मानधनाच्या अ, ब, आणि क अशा तीनच श्रेणी होत्या. आता यात अ+ अशी नवीन श्रेणीची भर घातली आहे.

मानधनाच्या नवीन रचनेनुसार अ+ श्रेणीत क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असेल. धोनीने डिसेंबर २०१४ मधेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो या अ+ श्रेणीच्या नियमात बसत नाही.

परंतु अजून या नवीन रचनेबद्दल निर्णय झालेला नाही. समितीने या रचनेचा प्रस्ताव बीसीसीआयच्या वित्त समितीकडे पाठवला आहे. ते याबद्दल त्यांचे विचार मांडतील. त्यानंतर या रचनेबद्दल निर्णय घेतला जाईल.

सध्या बीसीसीआयच्या अ मानधन श्रेणीमध्ये सात खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना वार्षिक २ करोड रुपये दिले जातात. तसेच ब श्रेणी खेळाडूंना १ करोड तर क श्रेणी खेळाडूंना ५० लाख रुपये एवढे मानधन दिले जाते.

या मानधनात वाढ करण्याची विनंती काही दिवसांपूर्वी विराट कोहली, रवी शास्त्री आणि एम एस धोनी यांनी केली होती. याबद्दल त्यांची सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समिती अध्यक्ष विनोद राय यांच्याशी चर्चा देखील झाली होती.

Comments
Loading...
%d bloggers like this: