दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे अश्वारोहण स्पर्धा रविवारी; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धकांचा सहभाग

पुणे। दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २६ मे रोजी सकाळी ७ वाजता शिवसृष्टी आंबेगाव कात्रज येथे ही स्पर्धा होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ३० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीचे गुणेश पुरंदरे यांनी दिली.

शो जंपिंग, हॅक्स, पोलबेंडिंग, फॉल्ट अ‍ॅन्ड आउट, ड्रसाज, पोल बेंडिंग या प्रकारात स्पर्धा होणार आहे. तसेच स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजता अश्वारोहणातील विविध प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना मेडल्स आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. तसेच सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या रायडरला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ७ वाजता होणार असून यावेळी उद्योजक बाबासाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर, स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर.ए.अडगुलवार, उद्योजक जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने अश्वारोहणाची प्रात्यक्षिके पाहण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.