या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग

सोमवारी(15 एप्रिल) मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात भारताचा नियमित यष्टीरक्षक एमएस धोनी बरोबरच पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे.

कार्तिकची 2007 नंतर पहिल्यांदाच भारताच्या विश्वचषकात निवड झाली आहे. तर धोनी हा त्याच्या कारकिर्दीतील चौथा विश्वचषक खेळणार आहे. विशेष म्हणजे 2007 चा आयसीसी विश्वचषक हा या दोघांचाही कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक होता.

त्यामुळे 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघात असलेले हे दोनच खेळाडू 2019 च्या विश्वचषकासाठीही भारतीय संघात असणार आहे.

परंतू 2007 च्या विश्वचषकात भारताच्या तीनही सामन्यात धोनीला यष्टीरक्षक म्हणून अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली होती. त्यामुळे कार्तिकला तीनही सामन्यात बाहेर बसावे लागले होते.

त्यानंतर मात्र कार्तिकचा 2011 आणि 2015 च्या विश्वचषकासाठी विचार करण्यात आला नाही. पण आता 2019 विश्वचषकासाठी त्याने रिषभ पंतला यष्टीरक्षण शैली आणि अनुभवाच्या जोरावर मागे टाकत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यावेळीही तो धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात असेल.

विशेष म्हणजे कार्तिकने धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. परंतू त्याला नंतर धोनी संघात आल्याने भारतीय संघाकडून कमी संधी मिळाल्या. कार्तिकने 5 सप्टेंबर 2004 ला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

त्यामुळे आता ज्या मैदानावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले त्याच मैदानात भारताला तिसरा विश्वचषक मिळवून देण्याची संधी कार्तिकला मिळणार का हे पहावे लागेल.

कार्तिकने पदार्पण केल्यानंतर काही महिन्यातच 23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध चितगाव येथे धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यानंतर धोनीने मागे वळून न पहाता त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि चांगल्या यष्टीरक्षणाच्या जोरावर भारतीय संघातील स्थान पक्के केले.

आता पुन्हा तब्बल 12 वर्षांनंतर धोनी आणि कार्तिक ही यष्टीरक्षकांची जोडी 2019 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात असणार आहे. त्यामुळे हे दोघे या विश्वचषकात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष राहिल.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश

या कारणामुळे कार्तिकला मिळाली पंत ऐवजी विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी