या कारणामुळे कार्तिकला मिळाली पंत ऐवजी विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

आज(15 एप्रिल) मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात भारताचा नियमित यष्टीरक्षक एमएस धोनी बरोबरच पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून विश्वचषकासाठी भारतीय संघात धोनीबरोबरच कार्तिकला संधी मिळणार की रिषभ पंतला यावर चर्चा सुरु होती. पण आता निवड समीतीने पंतच्या आधी कार्तिकला या संघात संधी दिली आहे.

निवड समीतीने मोठ्या चर्चेनंतर कार्तिकची निवड केली आहे. याबद्दल सांगताना प्रसाद म्हणाले, ‘नक्कीच आम्ही याबद्दल मोठी चर्चा केली. आमच्या सर्वांचे एकच मत होते की कार्तिक किंवा पंतला धोनी दुखापतग्रस्त झाला तरच संधी मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात यष्टीरक्षणसुद्धा महत्त्वाचे असते. त्याचमुळे आम्ही दिनेश कार्तिकची निवड केली.’

पंतने मागील काही महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले होते. मात्र त्याला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही.

पण कार्तिकने 2018 मध्ये त्याच्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे हे दोघेही पर्यायी यष्टीरक्षक म्हणून प्रबळ दावेदार होते.

महत्त्वाच्या बातम्या –

या दोन गोलंदाजांना अजूनही मिळू शकते विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

२०१९ विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंची अशी आहे कामगिरी