२००३च्या विश्वचषक संघातील त्या खेळाडूला आजही बीसीसीआयने केले नाही माफ !

जसे बीसीसीआयने मोहम्मद अझरुद्दीनच म्हणणं ऐकून घेत त्याला माफ केलं तसच बीसीसीआयमधील कुणातरी माझं म्हणणं ऐकून घेऊन मला माफ करेल असं म्हणणं आहे भारतीय संघाचा २००३च्या विश्वचषकातील सदस्य असणाऱ्या दिनेश मोंगियाचा.

गेले १० वर्ष हा दिनेश मोंगिया बीसीसीआयकडे सामना निश्चिती प्रकरणी अर्थात फिक्सिंग प्रकरणी माफी मागत आहे. मोंगियावर हे आरोप केले होते लू व्हिन्सेंट या न्युझीलँड माजी खेळाडूने.

२००७ साली दिनेश मोंगियाने इंडियन क्रिकेट लीग अर्थात आयसीएलमध्ये चंदीगड लायन्स संघाकडून भाग घेतला होता. त्याचा त्यावेळी संघ सदस्य असणाऱ्या लू व्हिन्सेंटने २०१५मध्ये सामना निश्चिती प्रकरणी आरोप मान्य केले होते. त्याने स्वतःबरोबर दिनेश मोंगिया आणि ख्रिस क्रेन या दोन खेळाडूंचे लंडन कोर्टात नाव घेतले होते. परंतु कोर्टाने नंतर मोंगियाला क्लीन चिट दिली होती.

४० वर्षीय दिनेश मोंगिया आजही यासाठी बीसीसीआयकडे माफी मागत आहे. शिवाय बीसीसीआयकडे बाकी असलेल्या मानधनासाठी विचारणा करत आहे.

मोंगिया हा २०००-२००३ या काळात भारतीय संघाचा पूर्णवेळ सदस्य होता. तो २००३च्या विश्वचषकाची अंतिम फेरीसुद्धा खेळला होता. २००६ साली भारतीय संघ जेव्हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला तेव्हा मोंगिया भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने भारताकडून ५७ एकदिवसीय आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे.

आयसीएलमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंना बीसीसीआयने २००९ मधील योजनेनुसार पुन्हा संघात स्थान दिले. परंतु यातून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले होते. परंतु त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यापासून बीसीसीआयने रोखले नव्हते.

मोंगियाच्या म्हणण्यानुसार आजही मोंगियाला बीसीसीआयने माफ केले नाही. ज्याप्रमाणे आंबटी रायडू किंवा स्टुअर्ट बिन्नी हे आयसीएल खेळून आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत त्याप्रमाणे त्यालाही संधी देण्यात आली नाही.