जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बीव्हीबी, मुंबई बॉईज, अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन, सिंबायोसिस संघांना विजेतेपद

पुणे । चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात बीव्हीबी तर मुलांच्या गटात मुंबई बॉईज संघाने तर सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात सिंबायोसिस – अ संघाने तर मुलांच्या गटात अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने शानदार कामगिरी बजावताना सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत बीव्हीबी संघाने सिम्बायोसीस-अ संघाला २६-२४, २५-१६ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. बीव्हीजी संघाकडून इशा बनकर, समीक्षा शितोळे, अदिती बनकर यांनी चमकदार कामगिरी बजावली. सिंबायोसिस संघाकडून मेघा नांदेकर, आर्या भट्टड, अनुषा रावेतकर यांनी चांगली लढत दिली.

१४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत मुंबई बॉईज संघाने राजीव साबळे फाउंडेशन संघाला २५-२०, २५-१५ असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. मुंबई बॉईजचे सोहम मोरे, अतुल मिश्रा, विग्नेश दळवी यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजीव साबळे फाउंडेशन संघाच्या अमन शिकारकर, सिद्धांत बासमनी, साहिल जोगळे खेळाडूंनी चांगली लढत दिली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीमध्ये सिंबायोसिस अ संघाने बीव्हीबी संघाला २६-२४, ५-२५, १५-८ असे पराभूत करताना विजेतेपद साकारले. सिंबायोसिस संघाकडून आर्या देशमुख, गायत्री सांगळे, ऋजुल मोरे, गार्गी घाटे यांनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. श्रद्धा रावल, अनुष्का कर्णिक, ऐश्वर्या जोशी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने पवार स्पोर्ट्स अकादमी संघाला २५-१७, १४-२५, १५-९ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने प्रेम जाधव, राजवर्धन एम. राज मोरे यांनी सुरेख कामगिरी बजावली. पवार स्पोर्ट्स अकादमी संघाकडून संभाजी घाडगे, रामकृष्ण शितोळे, पृथ्वीराज चव्हाण यांना संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष नंदू फडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, माजी नगरसेवक राजेंद्र वागस्कर, मोहोर ग्रुपचे भरत देसल्डा, कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, उत्तम केटरर्सचे संचालक नवज्योतसिंग कोच्चर, उद्योगपती सुरेश देसाई, नाना मते, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता राजेश रिठे, आयकर अधिकारी श्रीकांत पांडे, कैलास राउत, मार्केटयार्डचे अध्यक्ष गणेश घुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.