Australian Open 2018: ६वेळचा विजेता नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत

मेलबर्न । सर्बियाचा नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत पोहचला आहे. त्याने अल्बर्ट रामोस विलोनसला ६-२, ६-३, ६-३ असे पराभूत केले.

जोकोविच दुखापतीमुळे गेले अनेक महिने बाहेर होता. त्याने या स्पर्धेत झोकात आपले पुनरागमन केले आहे. त्याला स्पर्धेत १४वे मानांकन आहे.

२ तास २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचने विलोनसला कोणतीही संधी दिली नाही. जोकोविच सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे बराच वेळ त्याला खेळणेही अवघड झाले होते तरीही त्याने विलोनसला कोणतीही संधी दिली नाही.

जोकोविच जुलै महिन्यात विम्बल्डनमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो प्रथमच कोर्टवर परतला आहे. तो आज पूर्ण लयीत खेळत नसूनही चांगला विजय मिळवू शकला हे विशेष.

जोकोविच हा १२ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता असून त्याने ऑस्ट्रेलियन ओपन तब्बल ६वेळा जिंकले आहे. २०१६मध्येही त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे तो येथील टेनिसप्रेमींचा कायमच पहिल्या पसंतीचा खेळाडू राहिला आहे.

जोकोविचचा सामना आता दक्षिण कोरियाच्या ह्येन चुंगशी उपउपांत्यपूर्व फेरीत होणार आहे. त्याने स्पर्धेतील संभाव्य विजेत्या अलेक्झांडर झवेरव पराभूत केले आहे. ५ सेट चाललेल्या सामन्यात ह्येन चुंगने अलेक्झांडर झवेरवला ५-७, ७-६, २-६, ६-३, ६-० असे पराभूत केले.