पुणे ओपन: रोमानीयाच्या जॅकलीन अदिना क्रिस्टीनला दुहेरी मुकुट

पुणे । एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॅकलीन अदिना क्रिस्टीन हीने दुहेरी गटातील विजेतेपदा बरोबरच एकेरी गटातही विजेतेपद संपादन करत दुहेरी मुकुट संपादन केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात अंतिम फेरीत एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे रंगलेल्या लढतीत भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीला रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॅकलीन अदिना क्रिस्टीन कडून 6-3, 1-6, 6-0 असा पराभव पत्करावा लागला.

चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये जॅकलीन अदिना क्रिस्टीनने कारमानची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकुन आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये करमानने आपल्या जबरदस्त सर्व्हिस व आक्रमक खेळीच्या जोरावर हा सेट जॅकलीन विरूध्द 6-1 असा जिंकुन बरोबरी साधली. तिस-या व निर्णायक सेटमध्ये आपल्या अनुभव व कौशल्याचा वापर करत दुस-या चौथ्या गेममध्ये जॅकलीनने करमानची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा जिंकुन विजेतेपद संपादन केले. जॅकलीनने ईस्तमबुल येथे 25000डॉलर आयटीएफ स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

दुहेरी गटात जॅकलीन अदिना क्रिस्टीनने स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवाच्या साथीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांचा 4-6, 6-3, 10-7 असा पराभव करत दुहेरीचे विजेपद पटकावेल.

या स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 3900डॉलर, करंडक व 60डब्लुटीए गुण, उपविजेत्या खेळाडूला 2590 डॉलर, करंडक व 36 डब्लुटीए गुण देण्यात आले. तसेच उपांत्य फेरीतील खेळाडूंना 22 डब्लुटीए गुण, उपांत्यपुर्व फेरीतील खेळाडूला 11 डब्लुटीए गुण, दुसर्‍या फेरीतील खेळाडूला 6 डब्लुटीए गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूला 1 डब्लुटीए गुण देण्यात आला.

दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूंना करंडक व 50 डब्लुटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 30 डब्लुटीए गुण देण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आय.पी.एस अधिकारी विक्रम बोके व कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, नियोजन सचिव अश्विन गिरमे, पुणे ओपन फाऊंडेशनचे सदस्य शिवाजी चौधरी, समिर भांबरे व आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट: अंतिम फेरी 
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि करमान कौर थंडी(भारत,3) 6-3, 1-6, 6-0