धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या अन्वीत बेंद्रे याला दुहेरी मुकुट

पुणे। पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या गटात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुट पटकावला. महिला गटात हैद्राबादच्या निधी चिलुमुला हिने विजेतेपद संपादन केले.

पुना क्लब टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित कुणाल आनंदचा टायब्रेकमध्ये 7-5, 1-6, 7-6(5) असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या 2तास 30मिनिटे झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये कुणालने पहिल्याच गेममध्ये अन्वीतची, तर दुसऱ्या गेममध्ये अन्वीतने कुणालची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत अन्वीतने 2-1अशी आघाडी घेतली. त्यानंतर अन्वीतने कुणालची चौथ्या व आठव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-3अशी आघाडी घेतली.
सामन्यात 15-30अशा फरकाने आघाडीवर असताना 12व्या गेममध्ये कुणालने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत अन्वीतने सुरेख खेळ करत त्याची सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली.

पिछाडीवर असलेल्या कुणालने जोरदार कमबॅक करत अन्वीतची तिसऱ्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1असा सहज जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये अन्वीत याने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत कुणालची सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिला गटात अंतिम फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित तेलंगणाच्या निधी चिलुमुलाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत चौथ्या मानांकित आंध्रप्रदेशच्या सोहा सादिकचा 6-4, 6-0असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 30मिनिटे चालला. निधी ही हैद्राबाद येथे सायनेट टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक रवीचंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने रोहन भाटियाच्या साथीत परिक्षित सोमाणी व सुरेश दक्षिणेश्वर यांचा 2-6, 4-6, 10-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. महिला गटात तेलंगणाच्या श्राव्या चिलकलापुडी व गुजरातच्या वैदेही चौधरी यांनी तेलंगणाच्या हुमेरा शेख व मध्यप्रदेशच्या सारा यादवचा सुपरटायब्रेकमध्ये 4-6, 6-1, 10-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरूष दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूला 11,340 रूपये व महिला दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूला 7,560 रूपये अशी पारितोषिके देण्यात आले.

स्पर्धेतील एकेरीच्या पुरूष गटातील विजेत्या खेळाडूला 23,400 रूपये व 35 एआयटीए गुण तर, उपविजेत्या खेळाडूला 16,200 रूपये व 25 एआयटीए गुण देण्यात आले. महिला गटातील विजेत्या खेळाडूला 15,600 रूपये व उपविजेत्या खेळाडूला 10,080 रूपये देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष राहुल ढोलेपाटील, क्लबचे उपाध्यक्ष नितीन देसाई, आणि स्पर्धेचे संचालक व पुना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव सचिन राठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नल सरकार, शशांक हळबे, जयदीप पटवर्धन, विराफ देबू, नितीन कीर्तने, वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

अंतिम फेरी: एकेरी: पुरुष गट:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.कुणाल आनंद(दिल्ली)(2)7-5, 1-6, 7-6(5)

अंतिम फेरी: एकेरी: महिला गट:
निधी चिलुमुला(तेलंगणा)(7) वि.वि. सोहा सादिक(आंध्र प्रदेश)(4) 6-4, 6-0;

दुहेरी: पुरुष गट: अंतिम फेरी:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)/रोहन भाटिया(3) वि.वि.परिक्षित सोमाणी/सुरेश दक्षिणेश्वर(तामिळनाडू)(2)2-6, 4-6, 10-5;

दुहेरी: महिला गट: अंतिम फेरी:
श्राव्या चिलकलापुडी(तेलंगणा)/वैदेही चौधरी(गुजरात)वि.वि.हुमेरा शेख(तेलंगणा)/सारा यादव(मध्यप्रदेश)4-6, 6-1, 10-5.