स्वप्नांना सोडू नका, त्यांचा पाठलाग करा, ती नक्कीच पुर्ण होतील…

२४ एप्रिल १९७३, मुंबई. एका साध्याशा प्रसुतीगृहामध्ये रमेश आणि रजनी तेंडुलकर यांना एक पुत्र झाला. आज तो ४४ वर्षांचा आहे आणि अख्ख्या भारतदेशाच्या गळ्यातील ताईत आहे. अजून तरी कोणी ही सचिनचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करावा असं म्हटलं नाहीये त्यामुळे सध्या तरी २४ एप्रिल हाच एकमेव सचिनचा वाढदिवस आहे.

 

खरं तर २००० काय, सचिनसाठी २०००० शब्दसुद्धा अपुरे आहेत. त्याच्या नावावर असलेल्या विक्रमांची यादी करायला सुद्धा २०००० शब्द कमी पडतील. एका वाक्यात सांगायचे तर कसोटी सामन्यात आणि एक दिवसीय सामन्यात सचिन इतक्या धावा आणि सचिन इतकी शतकं कोणी ही काढलेली नाहीत. सचिनने​ २०० कसोटी सामन्यात १५९२३ धावा (पुढील सर्वाधिक – १३३७८) आणि ५१ शतके (पुढील सर्वाधिक – ४५) केली आहेत. एक दिवसीय​ सामन्यात १८४२६ धावा (पुढील सर्वाधिक – १३७०४) आणि ४९ शतके (पुढील सर्वाधिक – ३०) ठोकली आहेत.  या बाबतीत तो ‘विक्रमादीत्य’ आहे. पण फक्त अंकात सचिन समजणार नाही, कारण त्याने देशाच्या मानसिकतेत आणलेला बदल हा अजून मोठा आणि महत्वपूर्ण आहे.

 

जगात खूप कमी लोक अशी जन्माला येतात की जी स्वकर्तृत्वाने अनेक पिढ्यांच भविष्य बदलतात. सचिन त्यातलाच एक. पहिल्याच रणजी सामन्यात शतक ठोकून अवघ्या देशाचे लक्ष खेचलं. वयाच्या १६व्यावर्षी पाकिस्तानात जाऊन पाकीस्तानी तोफखान्याला सामोरा गेला. इम्रान, वासिम आणि वकार यांच्या समोर तग धरणाऱ्या या १६ वर्षांच्या मुलाला पाहून अख्ख्या क्रिकेटविश्वात कूजबुज चालू झाली की हा पोरगा वेगळा आहे. यामुळेच कदाचित तो १९९२ मध्ये यॉर्कशायर या इंग्लिश कौंटीसंघाचा पहीला विदेशी खेळाडू ठरला.

 

१९९६ च्या विश्वचषकातील उत्पांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सचिन असेपर्यंत भारत ९८/१ होता. सचिन बाद झाल्यानंतर अवस्था १२०/८ अशी झाली. १९९८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शारजात खेळलेल्या १३४ & १४३ धावांच्या वादळी खेळी पाहून अजूनही अंगावर काटा येतो. बटु वामनाने ३ पावलात पृथ्वी जिंकली होती पण सचिनने​ ती मात्र अवघ्या २ सामन्यात जिंकली. क्रिकेटची सर्वोत्कृष्ट ‘रन मशिन’ समजले जाणारे सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला पाहून मला माझ्या फलंदाजीची ​आठवण येते असे उद्गार काढले होते.

 

२००३ मध्ये​ त्याने ६७३ धावा काढून अख्खा विश्वचषक गाजवला, इतक्या धावा एका विश्वचषकात कोणीही ​काढू शकले नाहीये​. इथंपर्यंत तो क्रिकेट मधला देव बनला होता. यानंतर पुढील काही वर्षात द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सेहवाग आणि इतर अनेक फलंदाजांना साथीशी घेऊन भारताला अनेक विजय मिळवून दिले. हिरो कप अंतिम सामना तसेच इतर अनेक सामन्यात गोलंदाजीची​ चूणूक दाखवत समोरच्या संघाची भंबेरी उडवली. त्याने एक दिवसीय सामन्यात १५४ बळी घेतले आहेत, फक्त १० भारतीय गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त बळी मिळविले आहेत.

 

२०१० मध्ये सचिन एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. २०११ मध्ये भारतात भारताने विश्वचषक जिंकला आणि सचिनच २२ वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. यावेळी विराट कोहलीने सचिनला​ खांद्यावर घेऊन मैदानाची फेरी मारली. तेव्हा कोहलीच्या उद्गारांनी अख्ख्या देशाचे डोळे ओले झाले, तो बोलला “२१ वर्षे सचिनने देशाचे​ ओझे अंगावर घेतले, आता वेळ आहे त्याला​ उचलून घ्यायची” (“Tendulkar has carried the burden of the nation for 21 years, it was time we carried him.”).

 

२०१३ मध्ये जेव्हा सचिनने कसोटी सामन्यातून निवृत्ती जाहीर केली तेव्हा ते कुठल्याही महापुरुषाच्या महानिर्वाणासारखंच होतं. शेवटच्या सामन्यात जेव्हा त्याने परत येऊन वानखेडेच्या खेळपट्टीला  नमस्कार केला तेव्हा सचिन बरोबर अख्खा देश ढसाढसा रडत होता. सचिन शिवाय क्रिकेट ही कल्पनाच​ मनाला पटत नव्हती.

 

खरं तर सचिन महती किती ही शब्दात सांगायची म्हणजे दिव्यच आहे. या माणसाने अख्ख्या देशाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. प्रत्येक आई-बापाला आपल्या मुलात सचिन दिसला म्हणून देशाला रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि इतर अनेक खेळाडू मिळाले. एक साधासुधा चाळीत राहणारा मुलगा सुद्धा अफाट परीश्रम करून संपूर्ण जग जिंकू शकतो हा विश्वास जागृत करणं हे कुठल्याही stats च्या तागडीत बसवता येणार नाही. आणि असलं तरी आपुलकी इतकी की सचिनचा उल्लेख एकेरीत​ ‘सचिन’ असाच करतो.

 

जाता जाता सचिनने​ १०० आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण केल्यानंतरचे उद्गार सांगावेसे​ वाटतात. तो म्हणाला “स्वप्नांना सोडू नका, त्यांचा पाठलाग करा, ती नक्कीच पुर्ण होतील”.

 

ओमकार मानकामे 

( [email protected] , Twitter:  https://twitter.com/Oam_16 )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)