थरारक सामन्यात शेवटच्या मिनीटाला दुर्गामाताचा विजय

मुंबई । पूर्ण सामन्यात आघाडीवर असलेल्या संस्कृतीने शेवटची पाच मिनीटे असताना केलेला चुकिचा खेळ दुर्गामाता स्पोर्टस् क्लबच्या पथ्यावर पडला आणि 27-17 अशा आघाडीवर असलेल्या संस्कृती प्रतिष्ठानला आगरी महोत्सवाच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत जिंकता जिंकता शेवटच्या क्षणी 28-27 अशी अवघ्या एका गुणाने हार पत्करावी लागली.

तसेच अन्य दोन सामन्यात भवानीमाता क्रीडा मंडळाने बालमित्रचा 30-15 असा धुव्वा उडवला तर साई के दिवाने संघाने गणेश कृपाचा 35-11 असा फडशा पाडत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात उभारलेल्या किरण पाटील क्रीडानगरीत बोकड आणि कोंबड्यासाठी सुरू झालेल्या द्वंद्वाचा उद्घाटन सोहळा खासदार राहुल शेवाळे, आयोजक दिनेश पाटील, मिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्याच सामन्यात कबड्डीप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. संस्कृतीच्या अवधुत धुरीच्या वेगवान चढायांनी दुर्गामाता प्रारंभापासूनच सळो की पळो करून सोडले होते.

अवधुतने एकाच चढाईत टिपलेल्या तीन गुणांमुळे त्याने सातव्या मिनीटालाच दुर्गामातावर लोण चढवला. त्याला मयुर काटे आणि सुयश दिघे यांचीही सुरेख साथ लाभल्यामुळे मध्यंतराचा खेळ थांबायला दोन मिनीटे असताना त्यांचा संघ 15-7 असा आघाडीवर होता.

मात्र त्यानंतर दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे आणि शुभम इंगळेने काही दमदार चढाया करत मध्यंतराचा गुणफलक 15-11 वर आणला. उत्तरार्धात पुन्हा एकदा संस्कृतीने डोके वर काढले. अवधुतने आपला भन्नाट खेळ कायम राखत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.

शेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना असलेल्या 27-17 या गुणफलकामुळे संस्कृतीचा विजय निश्चित वाटत होता. पण त्याचवेळी बचावात्मक खेळ करण्याऐवजी संस्कृतीच्या खेळाडूंनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला.

त्याचाच लाभ दुर्गामाताला झाला आणि त्यांच्या प्रथमेश आणि शुभमने जबरदस्त खेळ करीत सामन्यात पुनरागमन केले तर दुसरीकडे संस्कृतीच्या खेळाडूंना गुण मिळवणेच कठिण झाले होते. शेवटच्या मिनीटालाही संस्कृतीकडे 4 गुणांची आघाडी होती.

तेव्हा साहिल पाटेकरने एका वेगवान चढाईत दोन गुण टिपत गुणफलक 25-27 असा आणला. त्यानंतर संस्कृतीच्या शेवटच्या खेळाडूची पकड करून लोण चढवत 3 गुण पटकावले आणि सामन्यात अनपेक्षितपण 28-27 अशी आघाडी घेतली.

त्यानंतर शेवटची चढाई दुर्गामाताच्याच खेळाडूला मिळाली आणि त्याने वेळकाढूपणा करत आपल्या थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले.

अन्य झालेल्या सामन्यात भवानीमाता संघाने सिद्धेश परब आणि सुशांत धाडवेच्या सुसाट खेळाच्या बळावर बालमित्र मंडळाचा 30-15 असा पराभव केला.

साई के दिवाने संघाने गौरव सावंत आणि हेमंत बेळणेकरच्या खेळाच्या जोरावर गणेश कृपाचा 35-11 असा पाडाव केला.

या सामन्यात गणेश कृपाचा संघ हरण्यासाठीच उतरला असल्याचे दिसत होते. त्यामुळे हा सामना एकतर्फीच झाला. तसेच जय ब्राह्मणदेव संघाने छत्रपती शिवाजी मंडळावर 40-25 अशी मात केली. या सामन्यात अमोल गावंड आणि देवराज गावंड यांनी अप्रतिम खेळ केला.