डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे, आदर्श गोपाळ यांना विजेतेपद

ईशा जोशी हिला दुहेरी मुकुट

पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे, आदर्श गोपाळ व ईशा जोशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत युथ(21 वर्षाखालील)मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत 21 वर्षाखालील मुलींच्या युवा गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात अव्वल मानांकीत ईशा जोशी हिने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत तिस-या मानांकीत पृथा वर्टीकरचा 4-3(11/8, 6/11, 9/11, 6/11, 16/14, 11/6, 11/9)असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात सुरुवातीला ईशाने पहिला सेट पृथाविरुद्ध 11/8असा तर, पृथाने दुसरा सेट ईशा विरुद्ध 11/6असा जिंकून बरोबरी साधली. पृथाने जोरदार आक्रमण करत ईशाविरुद्ध पुढील दोन्ही सेट 11/9, 11/6असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत पृथाला सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत ईशाने पुढील तीनही सेट 16/14, 11/6, 11/9 असे जिंकून विजेतेपद मिळवले. महिला गटातही ईशाने बाजी मारत सातव्या मानांकीत प्रिथीका सेनगुप्ता हिचा 11-9, 11-4, 11-7, 8-11, 11-9 असा पराभव करत दिहेरी मुकुटाचा मान मिळवला. ईशा स.प महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ईशाचे युवा गटातील या वर्षातील हे तिसरे तर महिला गटातील चौथे विजेतेपद आहे.

21 वर्षाखालील मुलांच्या युवा गटात शौनक शिंदे याने गौरव लोहपत्रेचा 4-2(11/8, 11/6, 2/11, 9/11, 11/9, 11/8)असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये शौनकने आपले वर्चस्व कायम राखत गौरव विरुद्ध 11/8, 11/6अशा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या गौरवने आपल्या खेळात नवीन रणनिती आखत शौनकविरुद्ध पुढील दोन सेट 11/2, 11/9अशा फरकाने जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर शौनकने जोरदार पुनरागमन करत गौरव विरुद्ध पुढील दोन सेट 11/9, 11/8 असे जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. 16वर्षीय शौनक हा पी.जोग.महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून रेडियंट स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.

पुरूष गटात दहाव्या मानांकीत आदर्श गोपाळने बिगर मानांकीत गौरव लोहापात्रेचा  4-2(11-7, 12-14, 11-8, 5-11, 11-6, 12-10)  असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 16 वर्षीय आदर्श हा लॉयला हायस्कुल मध्ये शास्त्र शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील हे पहिलेच विजेतेपद आहे.

स्पर्धेत एकूण 80000रुपयांची पारितोषिके देण्यात आली.पृथा वर्टीकर हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्लबचे खजिनदार आनंद परांजपे, पीडीटीटीएचे संस्थापक सुभाष लोढा, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

21 वर्षाखालील युवा गट मुले- अंतिम फेरी

शौनक शिंदे(2) वि.वि गौरव लोहापात्रे(9) 4-2(11/8, 11/6, 2/11, 9/11, 11/9, 11/8)

21 वर्षाखालील युवा गट मुली- अंतिम फेरी

ईशा जोशी(1) वि.वि पृथा वर्टीकर(3) 4-3(11/8, 6/11, 9/11, 6/11, 16/14, 11/6, 11/9);

महिला गट- अंतिम फेरी

ईशा जोशी(1) वि.वि प्रिथीका सेनगुप्ता(7) 11-9, 11-4, 11-7, 8-11, 11-9

पुरूष गट- अंतिम फेरी

आदर्श गोपाळ(10) वि.वि गौरव लोहापात्रे 4-2(11-7, 12-14, 11-8, 5-11, 11-6, 12-10)