एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश-मेघालय, राजस्थान-आसाम संघांची विजयी सलामी

पुणे। उत्तर प्रदेश-मेघालय, राजस्थान-आसाम, जम्मू-काश्मीर-तामिळनाडू संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करतना भारतीय रोलबॉल संघटना व महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे आयोजन कोथरूड येथील महेश विद्यालय येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रीय क्रीडा मंत्रालयचे निरीक्षक ए. के. पात्रो, आमदार मेधा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे चेअरमन वसंत राठी, आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे संचालक डॉ. अजित मापारी, उद्योजक महेश माथवड, सचिन जोशी, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्तर प्रदेश- मेघालय संघाने मध्यप्रदेश-मणिपूर संघाला ४-२ असे पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली. उत्तर प्रदेश-मेघालय संघाच्या एम. सत्ययाम याने २ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पी. अनुज व पुष्पम पटेल यांनी प्रत्येकी १ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. मध्यप्रदेश-मणिपूर संघाकडून तनिष्क वर्मा व आकर्ष जैन यांनी प्रत्येकी १ गोल करताना चांगली लढत दिली.

अनुराग पी. व महिपाल सिंग यांच्या प्रत्येकी ४ गोलांच्या जोरावर राजस्थान-आसाम संघाने उत्तराखंड-कर्नाटक संघाला ८-२ असे एकतर्फी पराभूत केले. उत्तराखंड-कर्नाटक संघाच्या रवींद्र रामने २ गोल करताना चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

जम्मू-काश्मीर-तामिळनाडू संघाने हिमाचल प्रदेश – केरळ संघाला ६-२ असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. जम्मू-काश्मीर-तामिळनाडू संघाकडून के. रिषभने ३ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शैलेश, प्रबलसिंग व मनविजय सिंग यांनी प्रत्येकी १ गोल करताना के. रिषभला साथ दिली. हिमाचल प्रदेश-केरळ संघाकडून सुर्याजीत सिंग व नरुलसिंग यांनी प्रत्येकी १ गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.

अतितटीच्या लढतीमध्ये पंजाब-अरुणाचल प्रदेश संघाने महाराष्ट्र-ओडीसा संघाला ४-३ असे पराभूत करतना विजयी सलामी दिली. पंजाब-अरुणाचल प्रदेश संघाकडून जसप्रीत सिंगने ३ तर इंद्रजीत सिंगने १ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्र-ओडीसा संघाकडून अथर्व बिहाडेने २ तर ओंकार कवठेकरने १ गोल करताना चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.