येत्या शनिवारी रंगणार एल क्लासीकोचा थरार

आज ला लीगच्या १६ व्या आठवड्याचे जवळजवळ सर्व सामने पार पडले. गुणतालीकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बार्सिलोनाने आपले स्थान अधिक मजबूत केले तर व्हॅलेन्सियाला पराभवाचे तोंड पहावे लागले.

ॲटलेटिको डी मॅड्रिडने विजय मिळवून १ स्थानाची प्रगती करत दूसरे स्थान मिळवले तर रियल मॅड्रिडचा सामना फुटबाॅल क्लब वर्ल्डच्या अंतिम सामन्यामुळे होऊ शकला नाही.

येत्या शनिवारी होणाऱ्या एल क्लासीकोच्या पूर्वी दोन्ही संघांनी विजय मिळवत विजयी लय कायम राखली आहे. बार्सिलोनाने ला लीगामध्ये ४-० ने विजय मिळवला आहे तर रियल मॅड्रिडने १-० ने विजय मिळवत तिसऱ्यांदा फुटबाॅल क्लब वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

रियल मॅड्रिडने ग्रेमियो संघाचा क्लब वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात १-० ने पराभव केला. सामन्याच्या ५३ व्या मिनिटला रियल मॅड्रिडतर्फे एकमेव गोल क्रिस्तियानो रोनाल्डोने फ्री कीकवर केला.

लागोपाठ दुसऱ्यांदा मॅड्रिडने क्लब वर्ल्डकप आपल्या नावे केला. या बरोबरच बार्सिलोनाच्या तीन क्लब वर्ल्डच्या विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी पण केली.

बार्सिलोनाने डीपोर्टीवोचा ४-० ने पराभव केला. बार्सिलोनातर्फे सुवारेझ आणि पाॅलिन्होने प्रत्येकी २-२ गोल नोंदवले. मेस्सीला मिळालेली पेनल्टी त्याला गोल मध्ये रूपांतरीत करण्यात यश लाभले नाही त्यामुळे मुलरचा ५२५ गोल्सचा विक्रम मेस्सी क्लासीकोला रियल मॅड्रिडच्या घरच्या मैदानावर तोडणार का हा प्रश्न आहे.

शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता एल क्लासीकोचे थेट प्रक्षेपण होईल.

लीग मध्ये सध्या ॲटलेटिको डी मॅड्रिड दूसर्या स्थानावर आहे तर रियल मॅड्रिड चौथ्या. ॲटलेटिको डी मॅड्रिड आणि बार्सिलोना मध्ये ६ गुणांचा फरक आहे तर रियल मॅड्रिडमध्ये ११ गुणांचा. रियल मॅड्रिडने एक सामना इतर संघांपेक्षा कमी खेळला आहे.