अँडी मरेची यावर्षीची विंब्लडन असेल शेवटची स्पर्धा

ब्रिटनचा टेनिसपटू अॅंडी मरेने यावर्षी निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले आहे. त्याने यावर्षी होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेपर्यंत खेळण्याची इच्छा दर्शवली असून 14 जानेवारीपासून सुरू होणारे ऑस्ट्रेलियन ओपन ही त्याची कदाचित शेवटची स्पर्धा असेल असेही म्हटले आहे.

“विम्बल्डन पर्यंत माझी खेळण्याची इच्छा आहे. मात्र दुखापतीमुळे मी तोपर्यंत कदाचित खेळू शकणार नाही”, असे मरेने म्हटले आहे. मेलबर्न येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मरे बोलत होता. यावेळी त्याला अश्रूही अनावर झाले होते.

कारकीर्दीत तीन ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या मरेने मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून दुखापतीमुळे माघार घेतली होती. तर यावर्षी तो जून महिन्यात दुखापतीमधून सावरत कोर्टवर परतला होता.

मागील आठवड्यात झालेल्या ब्रिस्बेन ओपनमध्ये मरे दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडला होता.

मरेने त्याच्या कारकिर्दीत 2 वेळा विम्बल्डन (2013, 2016), एक वेळा युएस ओपन (2012), 2 ऑलिंपिक सुवर्णपदके आणि एक डेविस कपचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबरच त्याने एकूण 45 एटीपी एकेरीचे विजेतेपद आणि 14 एटीपी मास्टर्स 1000 पटकावले आहे.

2013मध्ये विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद मिळवणारा मरे 77 वर्षानंतर पहिलाच ब्रिटीश टेनिसपटू ठरला होता. फ्रेड पेरी यांनी 1936ला ब्रिटनकडून खेळताना विम्बल्डन जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर केएल राहुल, हार्दिक पंड्याला परतावे लागणार मायदेशी, कॉफी विथ करन प्रकरण अंगलट

विराट कोहली, रवी शास्त्रींसाठी ही आहे आनंदाची बातमी

खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राचा वेदांत व युगाची सोनेरी कामगिरी