पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका २८६ धावांवर सर्वबाद; भारताचीही खराब सुरुवात

केपटाऊन। आजपासून सुरु झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांवरच आटोपला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेतले आहेत. दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ३ बाद २८ धावा केल्या आहेत.

भारताने पहिल्या डावाची सुरुवात करताना सलामीवीर मुरली विजय(१) आणि शिखर धवनचे(१६) बळी लवकर गमावले. शिखरने आक्रमक सुरुवात केली होती, परंतु त्याला डेल स्टेनने झेलबाद केले. तर विजयला व्हर्नोन फिलँडरने डीन एल्गारकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या विराट कोहलीलाही विशेष काही करता आले नाही. त्याला ५ धावांवर असतानाच मोर्ने मॉर्केलने झेलबाद केले. यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉकने त्याचा झेल घेतला. दिवसाखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी, भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीनही फलंदाजांना लवकर बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने डीन एल्गारला शून्यावरच बाद केले होते. त्यानंतर त्याने एडन मारक्रम(५) आणि हाशिम अमलाला(३) बाद करून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ धावा अशी केली होती. परंतु त्यानंतर डिव्हिलियर्स आणि फाफ डुप्लेसिस यांनी ११४ धावांची शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला.

डिव्हिलियर्सने ८४ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याला आज कसोटी पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्रिफळाचित केले आणि आपला कसोटीतला पहिला बळी मिळवला. त्यानंतर काही वेळातच हार्दिक पंड्याने डुप्लेसिसला झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. डुप्लेसिसने १०४ चेंडूत ६२ धावा केल्या.

हे दोघे बाद झाल्यानंतर क्विंटॉन डिकॉकने व्हर्नोन फिलँडरला(२३) साथीला घेत ६० धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी तोडण्यात भुवनेश्वरला यश आले. त्याने डिकॉकला(४३) बाद केले. त्यानंतर आलेल्या केशव महाराज(३५), कागिसो रबाडा(२६), डेल स्टेन(१६*) आणि मोर्ने मॉर्केल(२) या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या धावात भर घातली.

भारताकडून भुवनेश्वर(४/८७), आर अश्विन(२/२१), मोहम्मद शमी(१/४७), बुमराह(१/७३) आणि पंड्या(१/५३) यांनी बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद २८६ धावा
भारत पहिला डाव: ३ बाद २८ धावा
रोहित शर्मा(०*) आणि चेतेश्वर पुजारा(५*) नाबाद खेळत आहेत.