जय दत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत ग्राफीन जिमखाना व विकास क्रीडा मंडळाचे आव्हान संपुष्टात.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.व मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने व जय दत्त क्रीडा मंडळ प्रभादेवी, राजाराम साळवी उद्यानातील “स्व.किरण बाळू शेलार” क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम संघ, एस एस जी फाऊंडेशन, जय दत्तगुरु, सह्याद्री मित्र मंडळ यांची जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित “स्वप्नसाफल्य चषक” कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. अ गटात उपनगरच्या सह्याद्री मित्र मंडळाने ठाण्याच्या शिवशंकरचा २९-२४ असा पराभव करीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

पहिल्या साखळी सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांना या सामन्यात विजयी होणे गरजेचे होते. मध्यांतराला १४-०९ अशी आघाडी घेणाऱ्या सह्याद्रीने उत्तरार्धात सावध व संयमाने खेळ करी हा विजय साकारला. भरत कलगुटकर, प्रणय रुपये सह्याद्रीकडून, तर साहिल गायकवाड, सुमित नेंनवाल उत्कृष्ट खेळले.

क गटात पालघरच्या श्रीराम संघाने ठाण्याच्या ग्रिफिन जिमखान्याचा ३८-१४ असा सहज पाडाव करीत आगेकूच केली.मध्यांतराला २१-०२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या श्रीराम संघाकडून अविनाश पालवे, प्रशांत खेडेकर यांचा खेळ चमकदार झाला. ग्रिफिन कडून उत्तरार्धात अक्षय केंद्रेने बऱ्यापैकी लढत दिली. ग्रिफिन जिम. च्या या सलग दुसऱ्या पराभवामुळे त्यांच्यावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली.

ब गटात मुंबईच्या दोन संघात लढत झाली. त्यात एस एस जी फाऊंडेशनने विकास मंडळाला ६३-३८ असे चोपून काढत या गटात आगेकूच केली. मध्यांतराला २७-१७ अशी आघाडी घेणाऱ्या एस एस जी.ने दुसऱ्या डावात देखील त्याच जोशाने खेळ करीत मोठ्या फरकाने हा विजय साजरा केला.उदयोन्मुख खेळाडू पंकज मोहिते, ओमकार साजेकर या विजयाचे शिल्पकार ठरले. विकास मंडळाचा अवधूत शिंदेंची आज मात्रा चालली नाही.

आजच्या शेवटच्या क गटातील सामन्यात जय दत्तगुरुने बलाढ्य विजय क्लबला ५१-२१ असे धुऊन काढले.या पराभवामुळे विजय क्लबचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मध्यांतराला ३४-११ अशी विजयाच्या दृष्टीने आघाडी घेणाऱ्या दत्तगुरुने उत्तरार्धात तिसऱ्या चढाईवर खेळ करीत हा मोठा विजय साकारला.सिद्धार्थ बोरकर, रुपेश बोरकर या विजयात चमकले. विजय क्लबचा आदित्य मोकल एकाकी लढला.

आज होणारे सामने (८ मार्च २०१९)

१) दुर्गामाता स्पोर्ट क्लब विरुद्ध शिवशंकर क्रीडा मंडळ
२) एस एस जी फाउंडेशन विरुद्ध पार्ले स्पोर्ट्स क्लब
३) सिद्धी प्रभा फाउंडेशन विरुद्ध श्री राम
४) जय दत्तगुरू क्रीडा मंडळ विरुद्ध जागर स्पोर्ट्स क्लब