विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या या क्रिकेटपटूच्या भावाची झाली हत्या, तरीही तो खेळत होता संघासाठी

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु झालेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची रविवारी(14 जूलै) सांगता झाली. यजमान इंग्लंडने या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि त्यांचे 44 वर्षांचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले. हे इंग्लंडचे पहिलेच विश्वविजेतेपद आहे.

इंग्लंडच्या या विजयात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने या विश्वचषकात 11 सामन्यात4.57 च्या इकोनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो इंग्लंडकडून एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

आर्चरला पहिलाच विश्वचषक खेळताना एवढे यश मिळाले असले तरी त्याला एक दुखाची किनार आहे. कारण ज्यावेळी हा विश्वचषक सुरु होता त्या दरम्यान आर्चरचा चुलत भाऊ आशेन्टीओ ब्लॅकमॅनची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती.

30 मेला इंग्लंडचा या विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्लॅकमॅनची हत्या झाली. असे असतानाही आर्चरने या दु:खातून स्वत:ला सावरत विश्वचषकात शानदार कामगिरी केली.

याबद्दल आर्चरचे वडील फ्रँक यांनी टाईम्स वृत्तपत्राला सांगितले की ‘त्याचा(आर्चर) चुलत भाऊ त्याच्याच वयाचा होता आणि ते एकमेकांच्या खूप जवळ होते. त्याच्या भावाने हत्या होण्याच्या एक दिवसआधी त्याला संदेशही पाठवला होता.’

आर्चर बार्बाडोसमध्ये जन्मलेला असून तो यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्यास पात्र झाला होता. त्याला सुरुवातीला इंग्लंडच्या विश्वचषकासाठीच्या संघात संधी मिळाली नव्हती. पण नंतर त्याला संधी देण्यात आली.

बार्बाडोसमधून येऊन इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्याबद्दल त्याचे वडील म्हणाले, ‘त्याच्या ब्रिटीशनेसबद्दल लोक प्रश्न उपस्थित करतात. पण त्याच्या इंग्लंडसाठी खेळण्याने हे दिसते की तो प्रत्येकाला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा देत आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक जिंकला इंग्लंडने, सोशल मीडियावर चर्चा झाली टीम इंडियाची

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने विजेता ठरवण्यासाठी बाउंड्री नियमाऐवजी सुचवला हा पर्याय

विश्वचषक २०१९ दरम्यान झाले हे खास चार विश्वविक्रम