२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही

2019 विश्वचषक 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. या विश्वचषकासाठी इंग्लंडने आज(17 एप्रिल) 15 जणांचा प्राथमिक संघ घोषित केला आहे. या 15 जणांच्या संघात जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाला मात्र संधी मिळालेली नाही.

असे असले तरी अजूनही आर्चरचे विश्वचषकासाठी इंग्लंड संघाचे दरवाजे बंद झालेले नाही. त्याची आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध मे महिन्यात होणाऱ्या वनडे मालिकांसाठी इंग्लंड संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो त्याच्या कामगिरीच्या जोरावर विश्वचषकाच्या अंतिम संघात स्थान मिळवू शकतो.

इंग्लंडने आज जाहीर केलेल्या विश्वचषकासाठीच्या प्राथमिक संघाचे कर्णधारपद इयान मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात लियाम प्लंकेट, मार्क वूड, ख्रिस वोक्स, डेव्हिड विलि, टॉम करन आणि बेन स्टोक्स हे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय असणार आहेत.

विंडि़ज विरुद्ध यावर्षी झालेल्या वनडे मालिकेत विली खेळला नसला तरी मात्र इंग्लंडच्या निवड समीतीने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. त्याचबरोबर जो डेन्ली हा अष्टपैलू खेळाडू फिरकी गोलंदाजीला ज्यादाचा पर्यायही असेल. फिरकी गोलंदाजी मुख्यत: आदील राशीद आणि मोईन अलीवर अवलंबून असणार आहे.

इंग्लंडच्या या संघात फलंदाजांच्या फळीत जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, ऍलेक्स हेल्स, जो रुट, इयान मॉर्गन, जोस बटलर हे अनुभवी खेळाडू आहेत.

हा संघ विश्वचषकासाठी प्राथमिक संघ असल्याचे इंग्लंडच्या निवड समीतीने स्पष्ट केले आहे. या संघात 19 मे ला संपणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर बदल केला जाऊ शकतो. तसेच त्यांनी सांगितले की आयसीसीची प्राथमिक संघ पाठवण्याची अंतिम तारिख 23 एप्रिल असल्याने आम्ही हा संघ निवडला आहे.

पण पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 17 जणांच्या संघातील खेळाडू अजूनही अंतिम 15 जणांच्या संघात स्थान मिळवू शकतात.

इंग्लंडने विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला 15 जणांचा संघच 5 मेपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवला असून यात फक्त जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आर्चर आणि जॉर्डन या दोघांनाही अजूनही विश्वचषकासाठीच्या अंतिम संघात स्थान पक्के करण्याची संधी आहे.

इंग्लंड 3 मे ला आयर्लंड विरुद्ध एकमेव वनडे सामना खेळणार आहे. तसेच 5 मे पासून पाकिस्तान विरुद्ध 5 वनडे आणि एकमेव टी20 सामना खेळणार आहे. त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात यजमान असणारा इंग्लंडचा संघ पहिला सामना 30 मे ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे.

असा आहे इंग्लंडचा 2019 विश्वचषकासाठी प्राथमिक संघ – 

इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, जो डेन्ली, ऍलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, आदिल राशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड

पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – 

इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, जो डेन्ली, ऍलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, आदिल राशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

आयर्लंड विरुद्धच्या एकमेव वनडे आणि पाकिस्थान विरुद्धच्या एकमेव टी20 सामन्यासाठी असा आहे इंग्लंड संघ – 

इऑन मॉर्गन (कर्णधार), जोफ्रा आर्चर, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, जो डेन्ली, ख्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, आदिल राशीद, जो रूट, जेसन रॉय, जेम्स विन्स, डेव्हिड विली, मार्क वुड

महत्त्वाच्या बातम्या –

राजस्थान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आर अश्विनने केला भांगडा, पहा व्हिडिओ

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक

विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया