इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने व्यक्त केली निराशा

आयपीएलने गेले ११ वर्ष खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असते. याला इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट तरी कसा अपवाद ठरेल. मात्र यावर्षी त्याला कोणत्याही फ्रॅन्चायझींनी संघात संधी न दिल्याने त्याने निराशा व्यक्त केली आहे.

गार्डीयनने दिलेल्या वृत्ताप्रमाणे रूटने असे सांगितले की, “मला जास्त टी20 सामने खेळायची इच्छा आहे म्हणून मला आयपीएलमध्ये यायचे होते.त्यामध्ये मला फक्त पैसे कमवायचे नव्हते तर जास्तीत जास्त टी20 सामने खेळायचे होते. कदाचित मी कोणत्याच संघासाठी फीट नसेल म्हणून मला कोणीही निवडले नसेल. मी निराश आहे परंतू प्रत्येक संघाचे काही विचार असतात त्याप्रमाणे ते तयारी करतात आणि त्या हिशोबानेच ते खेळाडूंवर पैसा लावतात.”

भविष्यातील योजनाबाबत त्याने म्हटले,” आयपीएलचा हिस्सा नसल्याने पुढच्या कसोटी मालिकेसाठी मला चागंली तयारी करण्यासाठी वेळ मिळाला. जर आयपीएलमध्ये खेळलो असतो तर आणखी चागंला अनुभव मिळाला असता.”

जो रूट हा एक चांगला कसोटीपटू म्हणून ओळखला जातो मात्र अजूनही त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हवी तशी ओळख निर्माण करता आलेली नाही. याबद्दल तो म्हणला ” न खेळातच असे करणे खूप अवघड आहे.”

पुढच्या आयपीएल मोसमाबद्दल रूट म्हणाला, ” संघाचा भाग होणे हे काही माझ्या हातात नाही. आजकाल जास्त टी20 सामने खेळले जातात त्या सर्वांसाठी मी उपलब्ध नाही. पुढच्या वर्षी टी20 विश्व कप असल्याने मला आयपीएलमधून काही अनुभव मिळाला असता पण असे झाले नाही.”

रूटबरोबरच यावर्षी डेल स्टेन, मोर्ने मॉर्केल, इशांत शर्मा, इऑन मॉर्गन, हाशिम अमला, मार्टिन गप्टिल, जेम्स फॉकनर, जोश हेझलवूड अशा दिग्गज खेळाडूंनाही आयपीएलमध्ये संधी मिळालेली नाही.

पुढील महिन्यात ७ एप्रिल पासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरुवात होणार आहे.