वेस्ट इंडिजचा दोन दशकातील सर्वोत्तम विजय !

हेडिंग्ले,लीड्स: येथे झालेल्या रोमहर्षक डे नाईट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला त्यांच्या ५ विकेट्सने पराभूत केले. चौथ्या डावात ३२२ धावांचा पाठलाग करताना ज्या मैदानावर आतापर्यंतची चौथ्या डावातील सरासरी १६२ आहे त्या मैदानात वेस्ट इंडिजच्या या संघाने ३२२ धावांचा डोंगर सर केला. या विजयाचा शिल्पकार वेस्ट इंडिज संघाचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शाय होप ठरला.

पहिल्या कसोटीत हार मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजने आपला खेळाचा स्तर उंचावला. पहिला दिवसापासूनच वेस्ट इंडिजने या सामन्यात आपला दबदबा राखला होता. शैनन गेब्रियल आणि केमर रोच यांनी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी ४ विकेट्स घेऊन इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडकडून जो रूटने अर्धशतकी तर बेन स्टोक्सने शतकी खेळी करून संघाची धावसंख्या २५८ पर्यंत नेली .

वेस्ट इंडिजने त्यांच्या पहिल्या डावात ४२७ धावांचा डोंगर उभारला ज्यात सलामीवीर क्रेग ब्राथवेटने १३४ आणि शाय होपने १४७ धावा केल्या. ३५ वर ३ गडी बाद झालेले असताना या दोघांनी संघाला सावरले आणि संघाला जवळ जवळ ३०० च्या धावसंख्येपर्यंत नेले, त्यानंतर ब्राथवेट बाद झाला. पण होपने खालच्या फळीच्या फलंदाजांबरोबर फलंदाजी करून संघाला मोठी धावा संख्या उभारून दिली. इंग्लंडकडून जेम्स अँड्रेसनने ५ विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावातील खराब कामगिरी नंतर इंग्लंडने आपल्या फलंदाजीचा स्तर उंचावला आणि दुसऱ्या डावात ४९० धावा केल्या. या डावात इंग्लंडकडून सांघिक खेळ दिसला. स्टोनमॅन, रूट, म्लान, स्टोक्स, अली आणि वोक्स या सर्व फलंदाजांनी अर्धशतक लगावले. वेस्ट इंडिज कडून रोस्टन चेसने ३ विकेट्स घेतल्या.

शेवटच्या डावात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी ३२२ धावा हव्या होत्या. ज्या मैदानावर चौथ्या डावातील सरासरी धावा १६२ आहे, त्या मैदानावर वेस्ट इंडिज ३२२ धावांचा पाठलाग कसा करणार असा मोठा प्रश्न वेस्ट इंडिज पुढे होता. या प्रश्नाचे उत्तर दिले पहिल्या डावातील शतकवीर जोडी क्रेग ब्राथवेट आणि शाय होप यांनी. वेस्ट इंडिज दुसऱ्या डावात पुन्हा ५२ वर २ बाद अश्या बिकट परिस्तितीत होते आणि या दोन फलंदाजानी पुन्हा संघाला स्थिरावले. क्रेग ब्राथवेटने ९५ धावा केल्या तर शाय होप ११८ धावांवर नाबाद राहिला.

हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रा पर्यंत गेला आणि शेवटच्या तासामध्ये जेव्हा वेस्ट इंडिजची ५वी विकेट पडली तेव्हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकला असता. परंतु विंडीजने संधीचा फ़ायदा घेतला. १५ शतकात वेस्ट इंडिजला २७ धावा हव्या होत्या आणि फक्त ६ विकेट्स हातात होत्या पण तेव्हा होपने संयमी खेळ करत ब्रॉड आणि अँडरसन च्या गोलंदाजीला चोख प्रतिउत्तर दिले. हा वेस्ट इंडिजचा डे नाईट कसोटी मधील पहिला विजय आहे.

PC: http://www.espncricinfo.com