इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

त्याने सोमवारी (3 सप्टेंबर) हा सामना झाल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे.

भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता मालिका गमावल्यानंतर हा सामना जिंकून समाधानाने भारतात परतण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल तर इंग्लंडचा संघ कूकला शेवटच्या सामन्यात विजयी निरोप देण्याचा प्रयत्न करेल.

या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारला तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत चांगले पुनरागमन केले होते. परंतू पुन्हा एकदा चौथ्या सामन्यात विजयाच्या जवळ येऊनही भारताला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे ही मालिकाही गमवावी लागली.

तसेच या पाचव्या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघाची निवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनाला कसरत करावी लागणार आहे. परंतू भारताकडे गमावण्यासारखे काही नसल्याने ते काही प्रयोगही करुन पाहू शकतात.

भारतीय संघ या सामन्यात सलामीवीर फलंदाज केएल राहुल ऐवजी 18 वर्षीय पृथ्वी शॉला संधी देण्याची दाट शक्यता आहे. राहुल या मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे. त्याला 4 सामन्यातील 8 डावात फक्त 113 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याला पाचव्या सामन्यातून वगळण्याची दाट शक्यता आहे.

त्याचबरोबर हार्दिक पंड्या ऐवजी करुण नायरलाही संधी दिली जाऊ शकते. तसेच आर अश्विनला जर या सामन्यासाठी विश्रांती देिली गेली तर त्याच्या ऐवजी रविंद्र जडेजा खेळू शकतो.

त्याचबरोबर द रोज बॉल मैदानावर झालेल्या चौथ्या सामन्याप्रमाणेच पाचव्या सामन्याचीही खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. तसेच ती तिसऱ्या दिवसानंतर फिरकी गोलंदाजांनाही मदत करणारी असेल. त्यामुळे गोलंदाजांची भूमिका फलंदाजांप्रमाणेच महत्त्वाची ठरणार आहे.

भारताच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली बरोबरच अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ  बरोबरच मधल्या फळीवरही असणार आहे.

तसेच भारतीय संघ व्यवस्थापन भारत अ संघाकडून इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला धवन किंवा राहुल ऐवजी सलामीला संधी देणार का हे देखील पहावे लागेल.

इंग्लंड संघाच्या फलंदाजीची जबाबदारी ही अॅलिस्टर कूक, कर्णधार जो रुट, जॉस बटलर,जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंवर अवलंबून असेल. तर गोलंदाजीत जेम्स अँडरसन हा अनुभवी गोलंदाज संघात आहे. तसेच त्याच्या जोडीला स्टुअर्ट ब्रॉड, मोइन अली, अदिल रशीद असे गोलंदाज आहेत.

याबरोबरच अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन स्टोक्स, सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांच्याकडेही लक्ष असेल. चौथ्या कसोटीत संधी मिळालेल्या स्टोक्स आणि करनने इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

भारत विरुद्ध इंग्लंड: आमने-सामने –

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 61 कसोटी सामने झाले असुन भारताला यात फक्त 7 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर इंग्लंडने 33 सामने जिंकले आहेत आणि 21 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

तसेच केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत – इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 12 वेळा कसोटी सामन्यात आमने सामने आले आहेत. यात भारताला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

त्याचबरोबर इंग्लंडलाही या मैदानावर विशेष काही करता आलेले नाही. त्यांनाही 4 सामनेच भारताविरुद्ध या मैदानावर जिंकता आले आहेत. तर 7 सामने हे अनिर्णित राहिले.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे पाचवा कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना 7 सप्टेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, हार्दिक पंड्या, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

इंग्लंड: जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअरस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, बेन स्टोक्स, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

डेव्हिड बेकहमच्या नवीन फुटबॉल संघाची घोषणा

आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

विराट कोहलीच्या टीम इंडियाबद्दल केलेले हे वक्तव्य रवी शास्त्रींना भोवले