चौथी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा  केल्या आहेत.

पहिला दिवस संपण्यास काही वेळच शिल्लक असताना भारताने पहिल्या डावाची सुरुवात केली.  भारताकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि केएल राहुल पहिल्या दिवसाखेर अनुक्रमे 3 आणि 11 धावांवर नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी इंग्लंडकडून पहिल्या डावात अष्टपैलू खेळाडू सॅम करनने अर्धशतक करत इंग्लंडला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली आहे.

इंग्लंडची या डावाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर फलंदाज केटन जेनिंग्जला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्याच्या तिसऱ्या षटकातच शून्य धावेवर बाद केले.

त्यानंतर काही वेळातच इशांत शर्माने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला 4 धावांवर असताना पायचीत बाद केले. त्याआधी बुमराहनेही रुटला पायचीत बाद करण्यासाठी अपील केले होते.

परंतू पंचानी त्याला नाबाद ठरवले. त्यामुळे रुट बाद असल्याचा पूर्ण विश्वास असणाऱ्या बुमराहने भारताचा कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितले. पण यात बुमराहने नो बॉल टाकला असल्याचे आढळल्याने रुटला जीवदान मिळाले.

पण या जीवदानाचा रुटला फायदा घेता आला नाही. त्याला काहीवेळातच इशांतने बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.

यानंतर काही वेळात जॉनी बेअरस्टोनेही 6 धावांवर असताना आपली विकेट गमावली. नंतर अॅलिस्टर कूक(17), जॉस बटलर(21) आणि बेन स्टोक्स(23) हे देखील नियमित अंतराने बाद झाले.  त्यामुळे तळातल्या फलंदाजांना साथीला घेत डाव सांभाळण्याची जबाबदारी सॅम करनवर आली.

त्यानेही ही जबाबदारी चोख सांभाळताना मोइन अली आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्याबरोबर प्रत्येकी अर्धशतकी भागिदारी रचली. त्याने आठव्या क्रमांकावर खेळायला येत पहिल्यांदा मोइन अलीबरोबर सातव्या विकेटसाठी 87 धावांची भागिदारी केली. 

तसेच अली बाद झाल्यानंतर सॅम करनने ब्रॉडला साथीला घेत धावफलक सतत हलता ठेवला. त्याने ब्रॉड बरोबर आठव्या विकेटसाठी 63 धावांची भागिदारी रचली. या दोन भगिदाऱ्यांमुळे इंग्लंडने 200 धावांचा टप्पा केला.

अलीने इंग्लंडकडून या डावात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 40 धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक धावा सॅम करनने केल्या आहेत. करनने 8 चौकार आणि 1 षटकारांसह 136 चेंडूत 78 धावा केल्या आहेत.

भारताकडून बुमराहने सर्वाधिक 46 धावात 3 विकेट घेतल्या आहेत, तर अन्य गोलंदाजांपैकी इशांत शर्मा (2/26), हार्दिक पंड्या (1/51), मोहम्मद शमी (2/51) आणि आर अश्विन (2/40) यांनी विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक-

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 246 धावा

भारत पहिला डाव – बिनबाद 19 धावा

(शिखर धवन(3*) आणि केएल राहुल(11*) नाबाद खेळत आहेत.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

एशियन गेम्स: 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण तर पुरूषांना रौप्यपदक

एशियन गेम्स: भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक