ISL 2017: पुणे सिटीचा घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीकडून पराभव

पुणे । चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी एफसी पुणे सिटीला अंतिम टप्यात चकवित 1-0 असा महत्त्वपूर्ण विजय संपादन केला. चेन्नईयीनने याचबरोबर मोसमातील दुसऱ्या निर्णायक विजयाची नोंद केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात नऊ मिनिटे बाकी असताना हेन्रीक सेरेनो याने केलेला गोल निर्णायक ठरला. 80व्या मिनिटाला रॅफेल ऑगुस्टो याच्याऐवजी जेमी गॅव्हीलन याला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविण्यात आले.

पुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनला मिळालेला कॉर्नर गॅव्हीलन याने घेतला. त्याने नियंत्रीत वेगाने मारलेला चेंडू सेरेनोसाठी हेडींगच्यादृष्टिने उत्तम होता. त्याच्या मार्गात यजमान संघाच्या आदिल खान याचा अडथळा होता. सेरेनो याने आदीलला हुलकावणी देत अचूक हेडींग केले. चेंडू किन लुईस याच्या पायांमधून नेटमध्ये जाताच चेन्नईयीनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

चेन्नईयीनचा हा बाहेरील मैदानावरील (अवे मॅच) पहिलाच सामना होता. उभय संघांमध्ये लिगपूर्वी मित्रत्वाचा सामना झाला होता. त्यात 2-2 अशी बरोबरी झाली होती. आधीचा सामना जिंकला असल्यामुळे दोन्ही संघ फॉर्मात होते. त्यातही पुण्याचे पारडे घरच्या मैदानामुळे जड होते.

या पार्श्वभूमीवर ही लढत उत्कंठावर्धक होईल अशी अपेक्षा होती, पण पूर्वार्धात दोन्ही संघांना सफाईदार खेळ करता आला नाही. अंतिम टप्यात चेन्नईयीनने संधीचे सोने केले.

यामुळे चेन्नईयीनचे सहा गुण झाले आहेत. सरस गोलफरकामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुणे सिटीचे सुद्धा सहा गुण आहेत, पण त्यांचा तिसरा क्रमांक आहे. पहिल्या चारही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. बेंगळुरू आघाडीवर, तर गोवा चौथ्या स्थानावर आहे. पुणे सिटीने दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी केली आहे.

निकाल

एफसी पुणे सिटी : 0 पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (हेन्रीक सेरेनो 81)