इस्टोनिया रॅली संजय टकलेकडून पुर्ण

पुणे। पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने इस्टोनिया रॅली तांत्रिक बिघाडानंतरही पूर्ण केली. जागतिक रॅली मालिकेची चाचणी फेरी असलेल्या रॅलीत पहिल्या दिवशी तिसऱ्या स्टेजला वेगवान वळणावर इंजिनचे व्हॉल्व तुटल्यामुळे त्याला उरलेल्या स्टेजेस पूर्ण करता आल्या नव्हत्या. ही रॅली शनिवारी-रविवारी पार पडली.

बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशन संघाच्या तंत्रज्ञांनी अजिबात विश्रांती न घेता रात्रभरात फोर्ड फिएस्टा आर2 कारचे सर्व 16 व्हॉल्व नव्याने बसविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संजयने लॅट्वीयाचा नॅव्हीगेटर एडगर स्वेन्सीस याच्या साथीत आरसी4 गटात सातवे स्थान मिळविले. पहिल्या दिवशी सर्व स्टेजेस पूर्ण न केल्यामुळे संजयला एका तासाची पेनल्टी बसली. नऊ पैकी सहा स्टेजेस तो पूर्ण करू शकला नाही.

संजयने सांगितले की, सुरवातीला अवघड वळणावर वेगाने कार चालविल्याबद्दल व्हॉल्व तुटले होते. दुसऱ्या गिअरवरून पहिला गिअर बदलताना हे घडले. अशावेळी गर्टस आणि अॅटीस या तंत्रज्ञांनी रात्रभर जागून पहाटे सहा वाजता कार सुसज्ज केली. दुसऱ्या दिवशी आमच्या संघाची दुसरी कार भरकटली. त्यामुळे आमच्या संघाचे आव्हान आमच्यावर अवलंबून होते.

रॅली पूर्ण केलेल्या 67 स्पर्धकांत संजयचा समावेश होता. बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशन संघाची दुसरी जोडी ज्योस टोमास फर्नांडेझ-कार्लोस गॅराफा होती. त्यांची फोर्ड फिएस्टा आर2 कार उलटली. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. हे तेराव्या फेरीत घडले होते. अशावेळी संघासाठी रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक लक्ष्य गाठण्यास संजयने प्राधान्य दिले. त्याला सातव्या क्रमांकाचे आठ गुण मिळाले.