आयपीएलमध्ये पदार्पण करणारा हा ठरला ५००वा खेळाडू

मुंबई। वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सलामीचा सामना सुरु आहे. या सामन्यातून मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

या पदार्पण करणाऱ्या खेळाडूचे नाव आहे एवीन लेविस. हा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणारा ५०० वा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५०० खेळाडू खेळण्याचा महत्वाचा टप्पा आज पार झाला.

लेविसला मुंबई संघाने ३.८० कोटी देऊन संघात सामील करून घेतले होते. लेविस हा विंडीजचा सलामीवीर फलंदाज आहे. त्यांने आत्तापर्यंत ८४ ट्वेन्टी२० सामने खेळले असून ३४.०६ च्या सरासरीने २६५७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने विंडीजकडून १४ टी२० सामन्यात खेळताना ३६च्या सरासरीने २ शतके आणि २ अर्धशतकांच्या साहाय्याने ४६८ धावा केल्या आहेत. मात्र आज मुंबई संघाकडून पहिला सामना खेळताना त्याला अपयश आले. त्याला शून्य धावेवर दीपक चाहरने बाद केले.

मूंबईने चेन्नईसमोर आज विजयासाठी २० षटकात १६६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

याबरोबरच आज मुंबईकडून मयांक मार्कंडे आणि चेन्नईकडून मार्क वूड या दोघांनीही आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.