प्रो कबड्डी: ‘राकेश कुमार’साठी अस्तित्त्वाची लढाई?

४-५ वर्षांपूर्वी जेव्हा प्रो कबड्डी सुरु झालेली नव्हती आणि कबड्डी तितकीशी लोकप्रिय नव्हती तेव्हा कबड्डी रसिकांना माहित असलेल्या मोजक्या नावांमधलं एक नाव म्हणजे ‘राकेश कुमार’! कबड्डी विश्वातील सर्वात नावाजलेला खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख होत असे.सलग तीन तीन आशियाई स्पर्धांमध्ये (२००६,२०१०,२०१४) भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघामध्ये राकेशचा समावेश होता.

२०१४ च्या स्पर्धांमध्ये तर तो कर्णधार होता. अंतिम सामन्यात डोक्याला लागलेले असतांनाही राकेशने केलेला जिगरबाज खेळ सर्वांनाच माहित आहे. “कबड्डीतला सचिन तेंडुलकर” म्हणून त्याची ओळख आहे यातच सर्व काही आले!

असे असतांना प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वसाठी झालेल्या लिलावात त्याच्यावरच सर्वात जास्त बोली लागणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच.त्या पर्वातील सर्वात जास्त म्हणजे १२.८० लाखाची बोली राकेशवर लागली! राकेश मैदानावर उतरून धडाकेबाज खेळ करणार हीच सगळ्यांची अपेक्षा होती.मात्र असे झाले नाही. पहिले दोन पर्व ‘पाटणा पायरेट्स’चे प्रतिनिधीतत्व करतांना राकेशला लौकिकाला साजेसा असा खेळ करता आला नाही. तिसऱ्या व चौथ्या पर्वात ‘यू मुम्बा’कडून खेळतांना त्याने चांगला खेळ केला खरा पण त्याला जुन्या राकेशची सर नव्हती!

तसं तर राकेशला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही कारण कबड्डीत जे जे साध्य केले जाऊ शकते ते ते त्याने साध्य केलेले आहे. अर्जुन पुरस्कार,आशियाई स्पर्धांत सुवर्णपदक,विश्व कप स्पर्धा ही जिंकली आहे! मात्र ही प्रो कबड्डी आहे; इथे तुम्ही आधी काय केलयं त्यापेक्षा आत्ता काय करत आहात यालाच जास्त महत्त्व आहे! त्यामुळे राकेशसाठी हे पर्व ‘करो या मरो’ असे असेल.’तेलुगू टायटन्स’कडून जेतेपदासाठी लढताना आपल्या अस्तित्वाची लढाईच जणू त्याला लढावी लागणार आहे!

एक मात्र नक्की की या पर्वात काहीही झाले तरी राकेशचे अस्तित्त्व सदैव असेल त्याच्या चाहत्यांच्या मनात! विश्व कबड्डीच्या आकाशगंगेतला तो एक अढळ तारा आहे ज्याचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही! राकेश कुमारने या पर्वात जोरदार खेळ करावा आणि ‘जुनं ते सोनं’ हे सिद्ध करावं हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल!!!
 

-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )