फाफ डू प्लेसिसने व्यक्त केली सहानुभूती; स्मिथला पाठवला संदेश!

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथबद्दल सहानुभूती दर्शवली आहे. जोहान्सबर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्मिथ वरील एका वर्षाची बंदी हा कठोर निर्णय असल्याचे म्हटले.

केपटाऊन मध्ये झालेल्या चेंडू छेडछाडीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाप्रमाणे स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदीची कारवाई झाली आहे.

याबद्दल चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत डु प्लेसिस बोलत होता. यात त्याला याआधीही या मालिकेत ऑस्ट्रेलिया खेळाडूंकडून चेंडू छेडछाडीच्या प्रकार झाला आहे का असे विचारल्यावर तो म्हणाला, “माझ्यामते, हो. या मालिकेत बऱ्यापैकी चेंडू रिव्हर्स होत होता. आम्ही विचार केला की चेंडू इतक्या लवकर रिव्हर्स कसा होईल. दक्षिण आफ्रिकेत चेंडू इतका रिव्हर्स होणे पाहायला मिळत नाही.”

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ज्या घटना घडल्या त्याबद्दल डुप्लेसिस म्हणाला, “मागील आठवडा खूप विचित्र होता. स्मिथ ज्यांतूल जात आहे त्याबद्दल मला कळवळा आहे. तो एक चागंला खेळाडू असुन चुकीच्या वेळी तो पकडला गेला असे मला वाटते.”

पुढे डु प्लेसिस म्हणाला, ” मी त्याला संदेशही पाठविला आहे. मला मनापासून स्मिथ बद्दल खूप वाईट वाटले. अशा गोष्टींमधून खेळाडूंना जावे लागू नये असे मला वाटते. पुढील काही दिवस या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी खूप कठीण असतील. म्हणूनच मी स्मिथला पाठिंबा देणारा संदेश पाठवला आहे. तो या सगळ्यातून बाहेर येईल. त्याला कणखर होणे आवश्यक आहे.”

डुप्लेसिस आणि स्मिथ मागील दोन वर्षे आयपीएलच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स या एकाच संघाकडून खेळले आहेत.

त्याचबरोबर डुप्लेसिस म्हणला ” ही कसोटी मालिका खूपच वेगळी होती. चौथ्या सामन्यानंतर मोर्केलला निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा खूप महत्वचा सामना आहे.”

” ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमचे काय वातावरण असेल याचा विचार सुद्धा करू शकत नाही. एक संघ म्हणून आम्हाला पण याचे खूप वाईट वाटत आहे.”