Video: पाकिस्तानच्या या गोलंदाजाने घेतली टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक

काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अश्रफ हा टी २० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज बनला आहे. या त्याच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यात २ विकेट्सने विजय मिळवला.

अश्रफने सामन्याच्या पहिल्या डावातील १९ व्या षटकात श्रीलंकेच्या दसून शनाका, इसुरु उडाणा आणि माहेला उडवाट्टे या ३ फलंदाजांचा बळी घेऊन हॅट्रिक साजरी केली

सध्या अबुधाबीमध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अशी ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु आहे. यातील पहिल्या दोन्हीही सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवून २-० अश्या आघाडीने मालिका आधीच खिशात घातली आहे.

या मालिकेतील काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज अश्रफ चांगलाच चमकला. त्याने हॅट्रिक घेऊन श्रीलंकेच्या फलंदाजीला चांगलेच वेसण घातले होते. श्रीलंकेला या सामन्यात ९ बाद १२४ धावाच करता आल्या.

श्रीलंकेकडून दनुष्का गुनाथिलाकाने अर्धशतक केले. हे अर्धशतक सोडून बाकीच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. परंतु गोलंदाजीत जरा चांगली कामगिरी केली. थिसेरा परेराने ३ बळी मिळवले. परंतु त्यांनी पाकिस्तानला दिलेल्या कमी धावांच्या आव्हानामुळे पाकिस्तानने विजय मिळवला.