पहा विडीओ- … आणि क्षणात मुंबई इंडियन्सचा चाहता झाला धोनीचा पाठीराखा!

दोनच दिवसात आयपीएलने चाहत्यांवर गारुड घालायला सुरुवात केली आहे. त्यातच सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडल्याने चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.

हा सामना मुंबई संघाच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेट आणि १ चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला.

या सामन्यातून चेन्नई संघाने २ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले. तसेच कॅप्टन कूल एमएस धोनी १ वर्षांनंतर एखाद्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे चेन्नईचे आणि धोनीचे चाहते खुश आहेत. याचाच प्रत्यय चेन्नई आणि मुंबई यांच्या सामन्यादरम्यान आला.

या सामन्यात जेव्हा धोनी मैदानात आला तेव्हा एका मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या चाहत्याने लगेचच पिवळी म्हणजेच चेन्नईची जर्सी मुंबईच्या जर्सीवर परिधान केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

मुंबई आणि चेन्नई संघांचा चाहता वर्ग चांगलाच दांडगा आहे. यांच्या सामन्यादरम्यान नेहमीच चाहत्यांचा मोठा पाठिंबा पाहायला मिळतो. तसेच भारतात धोनीलाचाही मोठा चाहता वर्ग आहे. त्याला भारतातील प्रत्येक मैदानात पाठिंबा देणारे चाहते पाहायला मिळतात. यावेळीही मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर तो मैदानात येताच प्रेक्षकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला होता.