ISL 2017: एफसी गोवा पुन्हा एकदा विजयाच्या तयारीत 

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये गोवा संघाचा आजचा सामना केरला ब्लास्टर्स संघाबरोबर आहे. हा सामना गोव्याच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती होणार आहे.

गोवा संघाचा मागील सामना बेंगलुरु संघाबरोबर होता. या सामन्यात गोव्याने बेंगलुरु संघाला जोरदार टक्कर दिली. गोव्याने पहिल्याच हाफमध्ये तीन गोल केले.  बेंगलुरूच्या फेरान कोरोने दोन गोल केले तर तिसरा गोल मैनुअल लान्ज़रोटने केला.

याच हाफमध्ये बेंगलुरु संघाच्या मिकू याने एक गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये बेंगलुरुच्या एरिक पारतालुने व मिकूने मिळून दोन गोल करून सामना त्यांच्या बाजूला फिरवला परंतु कोरोने पुन्हा एकदा एक गोल करून  बेंगलुरु संघाचा पराभव केला व सामना ४-३ अश्या फरकाने जिंकला.

केरला ब्लास्टर्स संघाचा मागील सामना मुंबई सिटी एफसी बरोबर होता. या सामन्यात दोन्ही संघानी एकमेकांना कमालीची टक्कर दिली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये केरला ब्लास्टर्स संघाच्या मार्क सिफोनेसने पहिला गोल केला.

तर दुसऱ्या हाफमध्ये मुंबई सिटीच्या बलवंत सिंगने एक गोल करून सामना हरण्यापासून संघाला वाचवले व हा सामना दोन्ही संघाने १-१ अश्या बरोबरीने सोडवला.

दोन्ही संघांची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे आजचा सामना नक्की कोण जिंकेल याची सर्वांनाच उत्सुकता असेल.

हा सामना आज संध्याकाळी ८ वाजता सुरु होईल.