एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी व एफसी गोवा यांच्यातील सामना बरोबरीत  

गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी गोवा संघाला ३-३असे बरोबरीत रोखले.

गोवा येथील टिळक फुटबॉल मैदानावर झालेल्या या लढतीत सामन्याच्या सुरुवातीला एफसी पुणे सिटी संघाने जोरदार चढायांना प्रारंभ केला. ३ऱ्या मिनिटाला एफसी पुणे सिटीच्या मॅथ्यू मिल्सने गोल करून संघाचे खाते उघडले.

त्यानंतर एफसी गोवा संघाच्या आघाडीच्या फळीने प्रतिक्रमण केले. एफसी पुणे सिटीच्या गोलरक्षक बिलाल खान याने सुरेख गोलरक्षण करत एफसी गोवाचे आव्हान परतवून लावले. ४२व्या मिनिटाला एफसी पुणे सिटीच्या दिएगो कार्लोसने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून पूर्वार्धात २-०अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात मात्र एफसी गोवा संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळात नवीन रणनीती आखत वेगवान खेळ केला. ५२व्या मिनिटाला हेडन फर्नांडिसने चेंडूवर उत्तम ताबा मिळवत गोल करून संघाला १-२अशी स्थिती निर्माण करून दिली.

त्यानंतर ५९व्या मिनिटाला एफसी गोवाच्या लालम्पूईयाने गोल करून संघाला २-२अशी बरोबरी साधून दिली. लालम्पूईयाने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत ६९व्या मिनिटाला आणखी एक गोल करून संघाला ३-२अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या भरपाई वेळेत एफसी पुणे सिटीच्या एमिलीयानो अल्फारोने गोल केला व एफसी गोवाविरुद्धचा सामना ३-३असा बरोबरीत सुटला. दि. ९ सप्टेंबर रोजी एफसी पुणे सिटी संघाचा डेंपो एफसीशी सामना होणार आहे.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एफसी पुणे सिटी: ३(मॅथ्यू मिल्स ३मि., दिएगो कार्लोस ४२मि., एमिलीयानो अल्फारो ९२मि.)बरोबरी वि.एफसी गोवा: ३(हेडन फर्नांडिस ५२मि., लालम्पूईया ५९, ६९मि.).