घरच्या मैदानावर विजय मिळविण्यास पुणे आतूर

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची गुरुवारी बेंगळुरु एफसीविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याने यंदा तीनपैकी दोन सामने गमावले आहेत.
यानंतरही तीन गुणांसाठी पुण्याचे पारडे जड असल्याचा विश्वास प्रशिक्षक रँको पोपोविच यांनी व्यक्त केला.
 
दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी नऊ गुण आहेत. आघाडीवरील पहिल्या चार संघांचे प्रत्येकी नऊ गुण आहेत. त्यामुळे गुरुवारी विजय मिळवून स्थिती भक्कम करण्यासाठी पुणे आणि बेंगळुरु प्रयत्नशील असतील.
 
पोपोविच म्हणाले की, बेंगळुरु एफसी अप्रतिम संघ आहे. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू असल्याने संघ भक्कम आहे. त्यांच्या मोसमाचा प्रारंभ लवकर झाला.
त्यामुळे त्यांना स्पर्धात्मक सामने जास्त खेळण्याची संधी मिळाली, पण आम्ही घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे आमचे पारडे जड असले पाहिजे. आम्हाला कामगिरी करून दाखवावी लागेल.
मागील सामन्यात जमशेदपूर एफसीला हरविल्यामुळे पुण्याचे मनोधैर्य उंचावले आहे. पाच सामन्यांत प्रथमच जमशेदपूरचा बजाव भेदण्याची कामगिरी पुण्याने करून दाखविली.
याशिवाय पुण्याने यंदा प्रथमच एकही गोल न पत्करता क्लीन शीट राखली. या दोन्ही मुद्यांमुळे पोपोविचना आनंद वाटतो.
 
ते म्हणाले की, घरच्या मैदानावर मागील सामन्यात आम्ही चेन्नईयीन एफसीविरुद्ध हरलो ते अपघाताने. वास्तविक आम्ही चांगला खेळ केला. मी सदैव वास्तववादी राहतो.
आम्ही सामन्यागणिक खेळ उंचावतो आहोत आणि हे चांगले आहे. यावेळी आम्ही भक्कम संघाविरुद्ध खेळू. आमच्यासाठी ही एक मोठी कसोटी असेल. आम्ही निश्चींत आहोत आणि जास्त संघटित आहोत.
आमची समस्या म्हणजे अखेरच्या क्षणी काही खेळाडू जायबंदी होतात किंवा आजारी पडतात. त्यामुळे आम्हाला एकच संघ कायम खेळविता येत नाही.
 
लालछुआन्माविया फानाई याला मागील सामन्यात लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे पुण्याला विजयी संघात बदल करणे भाग पडेल.
पोपोविच यांच्यासमोर पर्याय असतील. गनी अहमद नीगम आणि साहील पन्वर या राखीव खेळाडूंना मुख्य संघात पाचारण करण्यात आले आहे.
 
बेंगळुरुचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांना आपला संघ हिरो आयएसएलमध्ये संभाव्य विजेता असल्याच्या चर्चेकडे जास्त लक्ष द्यावेसे वाटत नाही.
त्याऐवजी त्यांनी भक्कम प्रतिस्पर्ध्याचा आणि खास करून मार्सेलिनीयो आणि एमिलीयानो अल्फारो या स्ट्रायकर्सच्या जोडीचा उल्लेख केला.
रोका म्हणाले की, आम्ही अल्फारो आणि मार्सेलिनीयो यांच्या शैलीचा बराच अभ्यास केला आहे. त्यांना कसे रोखायचे याचे आम्ही बरेच व्हिडीओ पाहिेले आहेत.
ते चांगले खेळाडू आहेत, पण आम्हाला या सामन्याच्या तयारीसाठी फार कमी वेळ मिळाला. शेवटी एखादी चुक महाग पडू शकते. अशा खेळाडूंना रोखणे किती अवघड असचे याची आम्हाला जाणीव आहे.
सामना अवघड असेल असे आम्ही गृहीत धरले आहे. पुण्याचा संघ समान दर्जाचा आहे. त्यांच्या खेळाडूंकडे तसेच प्रशिक्षकांकडे आमची कोंडी करण्याइतपत पुरेसा अनुभव आहे. आम्ही हेच अपेक्षित धरले आहे.