विजेतेपदासाठी एफसी पुणे सिटी संघ सज्ज-गौरव मोडवेल

पुणे | एफसी पुणे सिटी संघाला गतवर्षी आयएसएल फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक उंचावता आला नव्हता. परंतु काही वेळा एखादे लक्ष्य साध्य करण्याकरीता जास्त काळ लागत असतो हे ध्यानात घेऊन आम्ही आमच्या संघावर विश्वास ठेवला आहे. गतवर्षी आम्ही विजेतेपदाच्या जवळ येऊन अगदी उपांत्य फेरीत पराभूत झालो होतो. यंदा मात्र विजेतेपदाचा करंडक जिंकून सर्वोच्च प्रतिष्ठा आणि सन्मान मिळविण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले. 

नव्या मौसमापूर्वी एफसी पुणे सिटी संघाच्या तयारीची आणि नव्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सेलिब्रेटिंग फुटबॉल”, म्हणजेच सर्वार्थाने मैदानावर आणि मैदानाबाहेरही फुटबॉलचा उत्सव साजरा करणे या तत्वावर आमचा विश्वास असून आमचे चाहते हे एफसी पुणे सिटी संघाचे सर्वात मोठे बलस्थान आहेत, असे मोडवेल यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की,  नव्या मौसमासाठी संघात 7भारतीय खेळाडूंचा समावेश  असून यामध्ये विशाल कैथ, अनुज कुमार आणि कमलजीत सिंग हे 3 गोलरक्षक, आशिक कुरूनियन, निखिल पुजारी, रॉबिन सिंग या 3 विंगर्स आणि साहिल पनवर समावेश आहे. अधिकाधिक युवा खेळाडूंना वाव देण्याचे आमचे धोरण असून 18वर्षाखालील अकादमीतील 4 खेळाडू आमच्या वरिष्ठ संघात सहभागी होते. यंदाच्या मौसमात 18वर्षाखालील 5 खेळाडूंना संघात सहभागी करण्यात आले असून 4परदेशी खेळाडूंचा समावेशदेखील संघात करण्यात आला आहे.

आमच्याकडे उत्तम दर्जाचे आक्रमण असून त्यामुळे भक्कम बचावाचा समावेश करण्याची गरज आहे हे ओळखून आम्ही या 3विंगर्सचा संघात समावेश केला आहे. प्रशिक्षकांच्या बाबतीत पोपोविच सोडून गेल्यानंतर आम्ही नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहोत. या नव्या प्रशिक्षकाच्या नेमणुकीसाठी अधिक वेळ लागत असला तरी, आमच्याकडे प्रशिक्षकांची उणीव नाही. अनेक प्रशिक्षक आमच्या संपर्कात आहेत. परंतु, पुन्हा आम्ही मागच्या वेळेसारखे पेचात सापडू शकत नाही. त्यामुळे आम्ही योग्य प्रशिक्षक मिळेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नव्या प्रशिक्षकाची नेमणूक आम्ही जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आयएसएलच्या संपूर्ण मौसमातील मोस्ट व्हॅल्युएबल आणि लोकप्रिय संघ म्हणून एफसी पुणे सिटीची निवड करण्यात आली आहे, हे जाहीर करण्यात मला आनंद वाटतो. परंतु यामध्ये आमच्या चाहत्यांचा आणि पुरस्कर्त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच, संघासाठी विविध योजना राबविणाऱ्या मार्केटिंग टिमचेही मी कौतुक करू इच्छितो. पहिल्या मौसमात आम्हांला आयटी क्षेत्राकडून खेळाडू लोनवर मागवून घ्यावे लागले होते. आता हा ट्रेंड पूर्णपणे उलटला आहे. एफसी पुणे सिटी संघात सहभागी होण्यासाठी दर्जेदार खेळाडू उत्सुक असून यामुळे आमच्या खेळाडूंना फुटबॉल विश्वात ओळख मिळाली आहे. 

युवा खेळाडूंसाठी आम्ही आता नवे युथ प्रोग्राम लाँच करत असून फुटबॉलच्या माध्यमातून नव्या बाजारपेठेलाही गवसणी घालत आहोत. पुणे हि छोटी बाजारपेठ असे हटले जाते. परंतु एफसी पुणे सिटी संघाने हा ट्रेंड बदलला आहे. मॉल, मल्टिप्लेक्स, स्टेडियम तसेच विविध रॅलीज यांच्या माध्यमातून आम्ही लक्षवेधी चाहत्यांपर्यंत पोहोचलो असून हा ट्रेंड आणखी वाढतच जाणार आहे. आता आम्ही आत्मपरीक्षण केले असून आमच्यातील उणिवा दूर करून एक परिपूर्ण संघ म्हणून मैदानात उतरण्याचा आमचा निर्धार असल्याचे मोडवेल यांनी सांगितले. 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कुठे गेला तुमचा कोहली?

-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी