महाराष्ट्र डर्बीत पुणे सिटीची सरशी

पुणे, दिनांक 2 मार्च ः एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमाची सांगता महाराष्ट्र डर्बी जिंकून केली. बाद फेरीतील आगेकूच याआधीच नक्की केलेल्या मुंबई सिटी एफसीला 1-2 असे पराभूत व्हावे लागले. पुणे सिटीने दोन्ही सत्रांत प्रत्येकी एक गोल केला. आदिल खान आणि इयन ह्युम यांनी ही कामगिरी केली. अंतिम क्षणी मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत अरनॉल्ड इसोकोने मुंबईची पिछाडी कमी केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढत पुणे सिटीसाठी लक्षवेधी ठरली. नवे प्रशिक्षक फिल ब्राऊन यांनी हिवाळी ब्रेकनंतर सुत्रे स्विकारली. त्यांना तसेच स्थानिक प्रेक्षकांनी पुणे सिटीच्या खेळाडूंनी घरच्या मैदानावरील विजयासह उत्साहित केले.
पुणे सिटीने याबरोबरच गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत सहावे स्थान गाठले. पुणे सिटीने 18 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून चार बरोबरी व आठ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 22 गुण झाले. त्यांनी एटीकेला (17 सामन्यांतून 21) मागे टाकले. एटीकेचा एक सामना बाकी आहे.
मुंबई सिटीने 18 सामन्यांतून 30 गुणांसह तिसरे स्थान मिळवित बाद फेरी नक्की केली आहे.
खाते उघडण्याची शर्यत पुणे सिटीने जिंकली. रॉबिन सिंगने चाल रचत चेंडू बॉक्समध्ये नीट मारला, जो मुंबई सिटीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून गेला. त्यावेळी दक्ष आदीलने चपळाईने पवित्रा घेत ओव्हरहेड किक मारली. त्यावेळी मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग सावरण्यापूर्वी चेंडू नटमध्ये गेला.
दुसऱ्या सत्रात कॅनडाचा दमदार खेळाडू इयन ह्युम याने गोल केला. महंमद यासीरने त्याला पास दिला. निर्धारीत वेळेत अखेरच्या मिनिटाला सार्थक गोलुईने ल्युचीन गोएनला ढोपराने धडक देऊन पाडले. त्यामुळे मुंबई सिटीला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर अरनॉल्ड इसोकोने अचूक फटका मारत ही संधी सत्कारणी लावली.
पहिला उल्लेखनीय प्रयत्न मुंबई सिटीने केला. रॅफेल बॅस्तोसने उजव्या बाजूला महंमद रफीकला पास दिला. रफीकने मोकळीक मिळताच बॉक्समध्ये चेंडू मारला, पण तो पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग याच्या फार जवळ होता. गोलरक्षकाने चेंडू बाहेर ढकलला. त्यामुळे मुंबई सिटीला कॉर्नर मिळाला, पण त्यावर विशेष काही घडले नाही.
सहाव्या मिनिटाला पुणे सिटीच्या मॅट मिल्स याला यलो कार्डला सामोरे जावे लागले. त्याने अरनॉल्ड इसोकोला पाडले. आठव्या मिनिटाला मुंबई सिटीला फ्री किक मिळाली. त्यावर पाऊलो मॅचादो याने उत्तम फटका मारला, पण चेंडू बारला लागून पुढे पडला. पुणे सिटीच्या बचावपटूंनी त्यावर नियंत्रण मिळविले.
पाऊलोने 15व्या मिनिटाला प्रयत्न केला, पण त्याचा फटका अचूकतेअभावी नेटपासून दूर गेला.
अॅलन डीरॉयने प्रतिस्पर्ध्याला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. त्याने नेटच्या दिशेने धावत उजवीकडील इसोकोला हेरले, पण त्याला पास देण्याएवजी त्याने चालीचा वेग कमी केला. तोपर्यंत पुणे सिटीचे बचावपटू योग्य स्थितीत आले. अखेर डीरॉयने इसोकोच्या दिशेने चेंडू मारला, पण तो खूप वरून होता. ही चाल वाया जाताच डीरॉयने हात वर करून दिलगिरी व्यक्त केली.
पुणे सिटीचा पहिला गोल झाल्यानंतर काही वेळ मध्य क्षेत्रातच खेळ झाला. त्यावेळी मुंबई सिटीवर चाली रचण्याचे जास्त दडपण होते. 28व्या मिनिटाला अखेर त्यांच्या प्रांजल भूमीजने प्रत्न केला. त्याने चेंडू मिळताच डावीकडे बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने उजव्या पायाने धाडसी फटका मारला, पण तो बाहेर गेला.