सेनादलचा उपांत्यफेरीचा मार्ग खडतर, कर्नाटकडून पराभूत

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज पहिल्याच सामन्यात कर्नाटक संघाने १ गुणाने सेनादलचा पराभव केला. या विजयात चमकले ते प्रशांत कुमार राय आणि शब्बीर बापू.

अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सेनादलकडून महाराष्ट्राच्या जीबी मोरेने चांगली कामगिरी केली. परंतु संघाला विजय मिळवून देण्यात त्याची ही कामगिरी कामी आली नाही.

पूर्वार्धात १२-१४ अशा आघाडीवर असणाऱ्या कर्नाटक संघाने जरी उत्तरार्धात मोठी आघाडी घेतली नसली तरीही ते पिछाडीवर गेले नाही. उत्तार्धात जेव्हा मनीष कुमार हा एकटाच खेळाडू मैदानात असताना त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून अजयला संधी देत सेनादलने प्रयत्त्न केला परंतु अजय रेडवेळी लॉबीमध्ये गेल्याने सेनादलवर लोन चढले आणि कर्नाटकने २१-१५ अशी आघाडी घेतली.

त्यानंतर सेनादलकडून जीबी मोरेने सुपर रेड मारत ही आघाडी २२-१९ अशी कमी केली. परंतु ही आघाडी तोडण्यात सेनादलला अपयश आल्यामुळे अखेर कर्नाटकने ३३-३२ असा विजय मिळवला.

प्रशांत रायने कर्नाटककडून २२ रेडमध्ये १५ गुण तर शब्बीर बापूने १२ रेडमध्ये ४ गुण घेतले. सेनादलकडून नितीन तोमरने १६ रेडमध्ये ८ गुण तर मोनू गोयतने ११ गुण घेतले.

या विजयाबरोबर कर्नाटक संघाने सेनादलचा उपांत्यफेरीमधील प्रवेश खडतर केला.