रिशांक देवाडीगाचा एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम

मुंबई । जोगेश्वरी येथील एसआरपी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या विद्यमाने सुरू असलेल्या तिसऱ्या फेडशन कप कबड्डी स्पर्धेत रात्री खूप उशीरा झालेल्या उत्कंठावेधक सामन्यात यजमान महाराष्ट्राने मध्यांतरातील २४-२९अशा ५गुणांच्या पिछाडीवरून राजस्थानला ५२-४९असे नमविले.

पहिल्याच चढाईत राजस्थानच्या वजीर सिंगची पकड करीत सुरुवात तर झोकात केली.पण नंतर मात्र राजस्थानने झटपट गुण घेण्याचा सपाटा लावत ५व्या मिनिटाला महाराष्ट्रावर लोण देत ९-२ अशी आघाडी घेतली.

महाराष्ट्राने देखील तोडीस तोड उत्तर देत १३व्या मिनिटाला त्या लोणाची फेड करीत १७-१४अशी आघाडी घेतली. रिशांकने आपल्या एकाच चढाईत ४ गडी टिपत हा लोण देण्यात महत्वाची भूमिका वठविली. या सामन्यात गुणफलक सतत दोन्ही बाजूला झुकत होता.

मध्यांतर होण्यास दोन मिनिटे असताना राजस्थानने ३रा लोण देत २८-२३अशी आघाडी घेतली. मध्यांतराला २९-२४असा राजस्थानच्या बाजूने गुणफलक होता. मध्यांतरानंतर महाराष्ट्राने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण करीत राजस्थानवर दुसरा लोण देत आपल्याकडे ३५-३३अशी आघाडी घेतली.

पुन्हा राजस्थानने उसळी घेत महाराष्ट्रावर तिसरा लोण देत ४४-४१अशी आघाडी घेतली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा ४५-४३अशी राजस्थानकडे आघाडी होती.

याने दबून न जाता महाराष्ट्राने पुन्हा एकदा निकराचे आक्रमण केले. यावेळी महाराष्ट्राने गिरीश इरनाक याला खेळविले. याचा मोठा फायदा संघाला झाला. त्याने मोक्याच्या क्षणी चार चित्तथरारक पकडी करीत या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

शेवटची दोन मिनिटे पुकारल्या नंतर महाराष्ट्राने तिसरा लोण देत ५१-४८अशी निर्णायक आघाडी घेतली व शेवटी ५१-४९असा साखळीतील दुसरा विजय मिळविला.

गिरीश इरणाकला थोडी इजा झाल्यामुळे त्याला विश्रांती देत बाद फेरीच्या सामन्यासाठी राखून ठेवले होते. पण संघ पराभवाच्या छायेत असल्यामुळे तो शेवटच्या क्षणी मैदानात उतरला. रिशांकने २१चढायात ३बोनस व १०गुण गुण असे १३गुण मिळविले. या सामन्यात निलेश साळुंखेने कमाल केली. त्याने १३ चढायात ७ झटापटीचे व ४ बोनस असे ११ गुण मिळविले. यात त्याची एक सुपर रेड होती.

मदनेने देखील ३बोनस देत त्यांना छान साथ दिली.राजस्थानकडून सचिनने १३ चढायात ३ बोनससह एकूण १३ गुण मिळविले. पण तो जायबंदी झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला.याचा फटका राजस्थानला बसला. दीपक हुडा, वजीरने देखील कडवी लढत दिली.