फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल बलाढ्य कर्नाटकचा पराभव करत विजेता

मुंबई । काल मुंबई शहरात पार पडलेल्या तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादलच्या पुरुष संघाने कर्नाटक संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले. जोगेश्वरीतील एसआरपीएफ मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी संघटनेने याचे आयोजन केले होते.

पुरुष गटात राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक तर हरियाणा संघाला पराभूत करत सेनादलने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सेनादलने कर्नाटक संघावर २८-२५ असा केवळ ३ गुणांच्या फरकाने विजय मिळवला आणि फेडशन चषकासह रोख रु. २,००,०००/-(₹दोन लाख)आपल्या नावे केले.

उपविजेत्या कर्नाटकला चषक व रोख रु.१,००,०००/-(₹एक लाख)वर समाधान मानावे लागले. सेनादलाने विजेत्यांच्या थाटातच खेळाला सुरुवात केली. सुकेश हेगडेची पकड करीत सेनादलाने गुणाचे खाते खोलले. १०व्या मिनिटाला लोण देत सेनादलाने ११-०२ अशी आघाडी घेतली.

नितीन तोमरने एकाच चढाईत ३गडी बाद केल्यामुळे हा लोण झटपट झाला.मध्यांतराला १५-०९अशी सेनादलाकडे आघाडी होती. या सामन्यात देखील विश्रांतीनंतर चुरस पहावयास मिळाली. विश्रांतीनंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी टॉप गिअर टाकत खेळात जान आणली. त्यांनी सेनादलाच्या लोणची परतफेड करीत मध्यांतरानंतर १०व्या मिनिटाला १८-१८अशी बरोबरी साधली.

शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २४-२४अशी बरोबरी होती. त्यावेळी मोनू गोयलने बोनस गुण घेत व बचावपट्टूनी दोन चित्तथरारक पकडी करीत सेनादला हा सामना जिंकून दिला. सेनादलाकडून सुरजितने अष्टपैलू खेळ करीत दोन पकडी केल्या व चढाईत ४गुण टिपले. मोनू गोयलने १७चढायात ३गुण व ४बोनस असे ७गुण मिळविले.

कर्नाटकच्या सुकेश हेगडेने १७चढायात ७गुण वसूल केले. प्रशांत रॉय थोडा कमी पडला. त्याला १७चढायात अवघे ३गुण मिळविता आले. तर दोन वेळा त्याची पकड झाली.

महिलांच्या गटाचे विजेतेपद रेल्वेला-
६५व्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजयी ठरलेले दोन्ही संघ या स्पर्धेत विजेते ठरले. जोगेश्वरी येथील एस आर पी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या वतीने संपन्न झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात रेल्वेने राष्ट्रीय विजेत्या हिमाचलचा प्रतिकार २६-२५असा मोडून काढत फेडशन चषकासह रु.२,००,०००/-(₹ दोन लाख) आपल्या खात्यात जमा केले.

उपविजेत्या हिमाचलला रोख रु. १,००,०००/-(₹एक लाख) व चषकावर समाधान मानावे लागले. सोनाली शिंगटेची पकड करीत हिमाचलने सुरुवात तर झोकात केली. पण पूर्वार्धात लोण देत रेल्वेने मध्यांतराला १६-०९अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली.

उत्तरार्धात मात्र सामन्यात चुरस पहावयास मिळाली. हिमाचलच्या निधी शर्माने चढाईत गुण घेत व सारिकाने पकडी घेत सामन्याची पाच मिनिटे शिल्लक असताना रेल्वेवर लोण देत आघाडी कमी केली. शेवटी आघाडी देखील घेतली.शेवटचे मिनिट शिल्लक असताना दोन्ही संघ २५-२५अशा बरोबरीत होते. सामन्याची शेवटची चढाई निधी शर्माने केली.

रेल्वेच्या पिंकी रॉयने तिची पकड करीत रेल्वेला विजय मिळवून दिला. याच बरोबर राष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा देखील घेतला. रेल्वेच्या पायल चौधरीने १२चढायात एक बोनससह ५गुण मिळविले. सोनाली शिंगटेने १३चढायात ३गुण व२बोनस असे ५गुण मिळविले. पिंकी रॉय व रिकू नेगी यांनी रेल्वेच्या बचावाची बाजू भक्कम सांभाळताना ३-३पकडी घेतल्या. हिमाचलकडून निधी शर्माने ५ चढायात ६ गुण मिळविले,पण ३वेळा तिची पकड झाली. सारिकाने ३ पकडी घेत तिला छान साथ लाभली. पण संघाला विजय मिळवून देण्यात हा खेळ कमी पडला.