फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील आजच्या लढती महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या

मुंबई । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद का मिळाले हे काल पुन्हा एकदा रिशांक देवडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने बलाढ्य राजस्थानचा पराभव करत दाखवून दिले. पहिल्या दोन दिवसात दोन विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्यफेरीत धडक मारली आहे.

असे असले तरी आज महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा सामना टीम रिशांक देवडिगाला खूप महत्वाचा आहे. कारण गटात अव्वल स्थान राखून अपेक्षेप्रमाणे ब गटातून अव्वल स्थानी येणाऱ्या सेनादल बरोबर उपांत्यफेरीत लढत टाळण्यासाठी आजचा विजय महत्वाचा ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूला अनुप कुमारचा हरियाणा संघही याचसाठी प्रयत्न करणार आहे. अनुपलाही उपांत्य फेरीत ही लढत सेनादलबरोबर नकोच असणार आहे. मुळात ४-५ दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या हरियाणा संघाला अजूनही स्पर्धेत आपला खास जम बसवता आलेला नाही.

असे असताना रिशांक देवाडिगाचा संघ भारताच्या या माजी कर्णधारच्या संघाविरुद्ध कसा खेळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अ गटात महाराष्ट्र आणि हरियाणा यांनी २ पैकी २ लढती जिंकल्या असून उत्तरप्रदेश आणि राजस्थान यांनी मात्र दोन्ही लढती गमावल्या आहेत. आज या दोन संघात होणारी लढत ही याचमुळे केवळ औपचारिकता आहे.

पुरुषांचा ब गट मात्र साखळी फेरीच्या शेवटच्या दिवशीही पूर्णपणे खुला आहे. या गटात अगदी काहीही होऊ शकते. सेनादलने १ पैकी १ लढत जिंकली असून ते आज २ सामने खेळतील. कर्नाटक आणि भारतीय रेल्वे २ पैकी एक सामना जिंकले असून एक लढत गमावून बसले आहे तर उत्तराखंडने १ लढत गमावली आहे.

महिलांच्या गटात-

महिलांच्या गटात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या सायली जाधवच्या टीम महाराष्ट्राला आज विजय अनिवार्य आहे. या संघाने पहिल्या दिवशी केरळ संघावर मोठा विजय मिळवला तर काल अर्थात दुसऱ्या दिवशी या संघाला हरियाणा संघाबरोबर पराभवाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राच्या महिला ब गटात असून या गटात भारतीय रेल्वे पहिला सामना जिंकून गटात अव्वल आहे तर हरियाणाने २ पैकी १ लढत जिंकत महाराष्ट्राप्रमाणे दुसरे स्थान पटकावले आहे. केरळने एक लढत खेळली असून त्यात ते पराभूत झाले आहेत.

महिलांच्या अ गटात मात्र राष्ट्रीय विजेत्या हिमाचल प्रदेशने २ पैकी २ लढती जिंकून अव्वल स्थान मिळवले असून ते आज तिसरा सामना खेळणार आहेत तर पंजाब आणि छत्तीसगढ संघाने २ पैकी १ सामना जिंकला आहे. उत्तरप्रदेशला मात्र दोन्ही लढती गमवाव्या लागल्या आहेत.